राज्यसभेप्रमाणे विधानपरिषदेच्या निवडणुकीतही महाराष्ट्राची जनता ‘हा’ चमत्कार पाहिल : अजित पवार

मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीप्रमाणे विधानपरिषदेच्या निवडणुकीतही चमत्कार घडेल, पण तो कोणाच्या बाजून घडेल हे सोमवारी महाराष्ट्राची जनता पाहिल, अस दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे.

राज्याच्या विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीच्या तयारीबाबत माहिती दिली.
अजित पवार म्हणाले, विधानपरिषद निवडणुकीत चार पक्षाचे एकूण ११ उमेदवार रिंगणात आहेत. महाविकास आघाडी म्हणून आम्ही सहा उमेदवार उभे केलेले आहेत. यामध्ये काँग्रेस ,राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांचे प्रत्येकी दोन उमेदवार आहेत. महाविकास आघाडीचे सर्व सहाच्या सहा उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करणार आहे. बहुजन विकास आघाडीला सर्वजण जावून भेटलो असून त्यांची मते आपल्याला मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. तसेच आजच्या घडीला २८५ आमदार मतदान करतील अशी शक्यता लक्षात घेता विजयी आमदारांना २६ मतांची गरज आहेत. तर ११ पैकी १० उमेदवार निवडून येणार असून एकट्याचा पराभव होणार. त्यामुळे चमत्कार तर होणार आहेच, पण तो कोणत्या बाजूने होणार ते सोमवारी महाराष्ट्र बघेल, असेही त्यांनी सांगितले.