राष्ट्रपतीपदासाठी उंची लागते, शरद पवारांकडे कोणती उंची आहे त्यांनी सांगावं

अकोला : राष्ट्रपतीपदासाठी एकमताने राष्ट्रवादीचे अध्यभ शरद पवार यांचं नाव घेण्यात येत आहे. राष्ट्रपतीपदासाठी एक उंची असावी लागते, शरद पवारांकडे कोणती उंची आहे हे त्यांनीच सांगावं. शरद पवार यांना उगाच चर्चेत आणलं जात आहे, असा टोला ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी शरद पवार यांना लगावला आहे.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीसाठी ममता बॅनर्जीच्या पुढाकाराने भाजप विरोधात एकत्र येण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. संयुक्त उमेदवार देण्याच्या औपचारिक निर्णय या बैठकीत घेण्यात आला होता. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेत चर्चा केली होती. तसेच विरोधी पक्षांकडून पवार यांचे नाव राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारासाठी पुढे आणले जात आहे. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षानेही राष्ट्रपतीपदासाठी शरद पवार यांना पाठिंबा देण्याचे संकेत दिले आहेत. राष्ट्रीय स्तरावर अशा घडामोडी सुरू असताना स्वत: शरद पवार यांनी मात्र आपण या पदासाठी स्पर्धेत नसल्याचं स्पष्ट केलं होत. मात्र यानंतर आता या सर्व पार्श्वभूमीवर वकिल गुणरत्न सदावर्ते यांनी शरद पवारांवर जोरदार निशाणा साधला आहे. राष्ट्रपती पदासाठी एक उंची असावी लागते. शरद पवार यांना उगाच चर्चेत आणलं जात आहे. अनेक वेगवेगळ्या जांगासाठी परिक्षा घेण्यात येतात. राष्ट्रपतीपदासाठी एक विशिष्ट बौद्धिक पातळी लागते. त्यामुळे शरद पवार यांनी ठरवावं त्यांच्याकडे कोणती उंची आहे आणि या पदावर जायचं की नाही, असंही ते पुढे म्हणाले.