मुंबईत राजभवनावर काँग्रेसचा मोर्चा

मुंबई : नॅशनल हेराल्ड प्रकरणात गांधी कुटुंबीयांना ईडीकडून चौकशीसाठी पाठवलेले समन्स आणि राहुल गांधी यांची तीन दिवसांपासून ईडीकडून सुरू असलेली चौकशी याच्याविरोधात मुंबईत काँग्रेसकडून राजभवनावर मोर्चा काढण्यात आला.

काँग्रेस नेते नाना पटोले, अशोक चव्हाण, भाई जगताप, वर्षा गायकवाड, हुसेन दलवाई, अस्लम शेख यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने, नेते, पदाधिकारी सहभागी झाले होते. हँगिंग गार्डन ते राजभवनाला घेराव घालण्यासाठी निघालेला हा मोर्चा पोलिसांनी रोखला आहे. राजभवन परिसरात पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता. राजभवनापासून ५०० मीटर अंतरावर हा मोर्चा अडवण्यात आला आहे. काँग्रेस कार्यकर्त्याचे म्हणणे आहे की, हा मोर्चा आम्हाला राजभवनापर्यंत नेऊ द्या आम्हाला राहुल गांधी यांच्यावर कारवाईचा निषेध व्यक्त करत राज्यपालांना निवेदन द्यायचे आहे.

दरम्यान, द्वेषापोटी गांधी परिवाराला बदनाम करण्यासाठी जे षडयंत्र भाजपने रचलं आहे ते संपवण्यासाठी आणि देशाच्या संविधानिक व्यवस्थेला टिकवण्यासाठी भाजपच्या हुकूमशाही विरोधात करण्यात येणाऱ्या राजभवन येथे आंदोलन करण्यात येत असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. नॅशनल हेराल्डमधील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी राहुल गांधी यांची मागील तीन दिवसांपासून ईडीकडून चौकशी सुरू आहे.

काँग्रेसच्या विनंतीनुसारच राज्यपालांसोबतची भेट रद्द

 काँग्रेस पक्षाच्या विनंतीनुसार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नाना पटोले, एच. के. पाटील आदींच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाला दिनांक १६ रोजी दुपारी ४.३० वाजता राजभवन येथे भेटीची वेळ दिली होती. परंतु आज बाळासाहेब थोरात यांच्या कार्यालयाकडून आलेल्या नव्या विनंतीनुसारच ही भेट रद्द करण्यात आली. राज्यपाल कोश्यारी राजभवन मुंबई येथे असून शिष्टमंडळाची भेट राजभवनाकडून रद्द केली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.  या संदर्भात काही नेत्यांनी राज्यपाल मुंबईत उपलब्ध नसल्याबाबत केलेले वक्तव्य चुकीचे असल्याचे राजभवनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.