विधानपरिषद निवडणुकीसाठी दोन्हीकडून सावध हालचाली

मुंबई : विधानपरिषदेच्या १० जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीमध्ये ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्यामुळे राज्यसभेसारखी चुरस निर्माण झाली आहे. सोमवारी २० जूनला ही निवडणूक होणार असून सर्वच राजकीय पक्षानी जोरदार मोर्चेबांधणी केली असून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह भाजपने आपापल्या आमदारांना मुंबईत बोलावलं आहे. महाविकास आघाडी आणि भाजप अशा दोन्ही बाजूकडून सावध हालचाली सुरु आहेत.

विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या गोटात हालचाली सुरु झाल्या आहेत. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या सर्व आमदारांना पुन्हा मुंबईत बोलावलं आहे. १८ तारखेला पवईमधील रेडियन्स हॉटेलमध्ये शिवसेना आमदार उपस्थित राहणार आहेत. सकाळी दहा वाजता शिवसेनेच्या सर्व आमदारांना हॉटेलमध्ये उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपल्या आमदारांना मुंबईत दोन दिवसात पोहोचण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयातून सर्व आमदारांना फोनवरुन बोलावणं धाडलं आहे. काही अपक्षांनाही मुंबईत बोलावलं आहे. सर्व आमदारांना मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवलं जाईल.
तर भाजपने देखील विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व आमदारांना १८ जूनला मुंबईत बोलावलं आहे. मुंबईत ताज प्रेसिडन्सी हॉटेलमध्ये या आमदारांचा मुक्काम असेल. भाजपने राज्यसभेप्रमाणे येथेही एक टास्क फोर्स नेमली असून याची जबाबदारी आशिष शेलार, गिरीश महाजन आणि प्रवीण दरेकर या त्रिमूर्तींवर टाकली आहे.