कागल (प्रतिनिधी) : देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या मंत्री नवाब मलिक यांच्यासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ रस्त्यावर उतरतात. मात्र सर्वसामान्य जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या पेट्रोल-डिझेल दर कमी करण्याबाबत त्यांनी काय केले? असा सवाल भाजपचे जिल्हाध्यक्ष व शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी उपस्थित केला.
राज्य शासनाने जाहीर करूनही पेट्रोल व डिझेल दर कपात न केल्याच्या निषेधार्थ मविआ सरकारविरोधात भाजपच्यावतीने येथे गैबी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत काढलेल्या विराट मोर्चावेळी ते बोलत होते. या मोर्चात महिलांसह नागरिक मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. राज्य शासनाच्या निषेधाचे फलक मोर्चेकऱ्यांनी हातात होते. तसेच निषेधाच्या घोषणाही दिल्या.
घाटगे पुढे म्हणाले, केंद्र सरकारने दोनवेळा पेट्रोल डिझेल दर कपात करुन सर्वसामान्यांना दिलासा दिला.या पार्श्वभूमीवर राज्य शासनानेही तातडीने पेट्रोल व डिझेल दर कमी करण्याची गरज होती. परंतु नागरिकांतून नाराजी व्यक्त झाल्यानंतर घाईगडबडीने राज्य शासनाने पेट्रोल व डिझेल दरात जुजबी कपात करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार पेट्रोल दरात दोन रूपये आठ पैसे तर डिझेल एक रुपये चव्वेचाळीस पैसे दर कपात केल्याचे जाहीर केले. राज्य सरकारने प्रत्यक्षात या दर कपातीची अंमलबजावणी अद्याप केली नाही. स्वतःला कर्तबगार मंत्री म्हणून घेणारे हसन मुश्रीफ यांनी काही दिवसांपूर्वीच कार्यक्रमासाठी आलेल्या शेकडो गाड्यांचे पेट्रोल व डिझेल महाराष्ट्रात न भरता त्यांनी कर्नाटकात भरण्याच्या सूचना केल्या. त्यातुन राज्याचा महसूल बुडवला. मुश्रीफांना थोडासा तरी जनतेचा कळवळा वाटत असेल तर त्यांनी आपल्या नेतृत्वाखाली महागाई विरुद्ध मोर्चा काढला तसा पेट्रोल डिझेल दर कमी करण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत आवाज उठवावा.
राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा सौ. नवोदिता घाटगे म्हणाल्या, राज्य शासनाने कपात न केल्याचा फटका गृहिणींना बसला आहे.त्यामुळे त्यांचे बजेट कोलमडले आहे.केंद्राप्रमाणे राज्य सरकारनेही त्वरित दर कपात करावी.
यावेळी शाहूचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, सर्व संचालक, राजे बँकेचे चेअरमन एम पी पाटील, व्हाईस चेअरमन नंदकुमार माळकर, शहराध्यक्ष सुशांत कालेकर,राजेंद्र तारळे, दगडू शेणवी आदी उपस्थित होते.
स्वागत प्रा. सुनील मगदूम यांनी केले.आभार तालुकाध्यक्ष संजय पाटील यांनी मानले.
.