महाविकास आघाडीला धोबीपछाड देत भाजपचा चमत्कार; धनंजय महाडिक बनले खासदार

मुंबई : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी चुरशीने झालेल्याा निवडणुकीत महाविकास आघाडीला धोबीपछाड देत भाजपच्या धनंजय महाडिक यांनी चमत्कार घडवला आहे. कोल्हापूरच्याच संजय पवार यांचा पराभव करत ते आता ‘माजी’चे आजी खासदार होणार आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या एकीची बेकी झाली. महाडिक यांच्यासह भाजपचे पियुष गोयल, अनिल बोंडे, शिवसेनेचे संजय राऊत, कॉंग्रेसचे इम्रान प्रतापगढी, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, विजयी झाले.

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून संजय पवार तर भाजपकडून धनंजय महाडिक हे कोल्हापूरचे दोन्ही उमेदवार मैदानात उतरल्याने प्रचंड चुरस निर्माण झाली होती. एका एका मतासाठी फिल्डिंग लावली गेली होती. या निवडणुकीत महाविकास आघाडीची कागदावरची गोळा बेरीज प्रत्यक्षात मात्र बिघल्याने धनंजय महाडिक यांचा खासदारकीचा मार्ग मोकळा झाला. तर संजय पवार यांचा दारुण पराभव झाला. महाडिक यांना ४१ तर संजय पवार यांना ३३ मते मिळाली आहेत.

महाडिक यांच्या विजयासाठी भाजपच्या नेत्यांनी एकत्रितपणे केलेले प्रयत्न, लावलेल्या जोडण्या फळास आल्या आहेत. या निकालातून महाविकास आघाडी सरकारला धोका असल्याचे स्पष्ट झाले आहे. या निकालाचा परिणाम २० जूनला होणाऱ्या विधान परिषद निवडणुतही दिसणार आहे. तसेच विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे दिव्य पार करताना महाविकास आघाडीला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. तसेच या निकालामुळे महाविकास आघाडी सरकारला धोका असल्याचे सिद्ध झाले आहे.

या निवडणुकीत भाजपच्या पियुष गोयल व अनिल बोंडे या दोघांनाही प्रत्येकी ४८ मते मिळाली. कॉंग्रेसच्या इम्रान प्रतापगढी यांना ४४ तर राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेल यांना ४३ मते मिळाली. शिवसेनेचे नेते संजय राऊत व भाजपच्या सहाव्या जागेचे उमेदवार धनंजय महाडिक यांना ४१ मते मिळाली. शिवसेनेचे पराभूत उमेदवार संजय पवार यांना अवघी ३३ मते मिळाली.

धनंजय महाडिक यांच्या विजयामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील भाजप व महाडिक गटाला उभारी मिळणार असून आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकित त्याचा फायदा होणार आहे.

राज्यसभेच्या निकालानंतर कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात भाजप व महाडिक गटाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

🤙 9921334545