मुंबई : शिवसेना आणि भाजपने प्रतिष्ठेची केलेली राज्यसभेच्या सहा जागांसाठीची निवडणूक आज प्रचंड चुरशीने पार पडली. पण अद्याप मतमोजणीलाच सुरूवात न झाल्याने सर्वच पक्ष अस्वस्थ झाले असून उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.
राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड, काँग्रेसच्या मंत्री यशोमती ठाकूर आणि शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्या मतदानावर भाजपने आक्षेप घेतला आहे. यामुळे निवडणूक आयोगाने मतमोजणी रोखली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी मतदान केल्यानंतर राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांच्याकडे मतपत्रिका दिली तर यशोमती ठाकूर यांनीही नाना पटोलेंकडे मतपत्रिका दिली. नंतर सुहास कांदे यांनी शिवसेनेबरोबरच राष्ट्रवादीच्या प्रतिनिधीला मतपत्रिका दाखवल्याचा आरोप करत या तिघांचे मत बाद करण्याची मागणी भाजपने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. तर महाविकास आघाडीकडून भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या मतांवर आक्षेप नोंदवण्यात आला आहे.
मतदानावर एकमेकांकडून आक्षेप घेतल्यानंतर मतमोजणी लांबली असून केंद्रीय निवडणूक आयोगाकडून हरकतींवर निर्णय आला नसल्याने प्रक्रियेला उशीर होत आहे. निवडणूक आयोगाला यासंबंधी ईमेल पाठवण्यात आला आहे, त्याचा निर्णय आल्यानंतर मतमोजणी सुरू होणार आहे.