गोकुळचे दूध संकलन वाढविण्यासाठी गावोगावी दौरा करणार : मुरलीधर जाधव

कोल्हापूर : गोकुळच्या दुधाला मागणी प्रचंड वेगाने वाढत आहे. त्यामुळे संघाने अधिकचे दूध संकलन करण्यावर भर दिला आहे आणि हेच लक्ष घेऊन शिरोळ तालुक्यातील प्रत्येक गावातून जास्तीत जास्त दूध गोकुळकडे संकलित होण्यासाठी तालुक्यातील दूध उत्पादकांच्या भेटीसाठी गावोगावी दौरा करणार असल्याचे मत शिवसेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख तथा ‘गोकुळ’चे संचालक मुरलीधर जाधव यांनी व्यक्त केले.

उदगाव येथील गोकुळच्या चिलिंग सेंटर भेटीप्रसंगी ते बोलत होते. गोकुळच्या माध्यमातून जनावरांची संख्या वाढविण्यासाठी व त्यांचे योग्य संगोपन करण्यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. त्याची माहिती खेडोपाड्यातील दूध संस्था व सामान्य दूध उत्पादकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. तसेच या योजनांचा जास्तीत जास्त लाभ दूध उत्पादकांना मिळावा हा हेतू लक्षात ठेवून शिरोळ तालुक्यातील प्रत्येक गावातील दूध संस्था तसेच दूध उत्पादकांच्या गोकुळच्या अधिकारी व कर्मचारी वर्गासह भेटी घेऊन दूध संकलन वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे मत संचालक मुरलीधर जाधव यांनी मांडले.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख मधुकर पाटील, तालुकाप्रमुख वैभव उगळे,आण्णासो बिलोरे, राजेंद्र पाटील यांच्यासह गोकुळच्या उदगाव चिलिंग सेंटरचे  अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.