औरंगाबाद : प्रेषित पैगंबर यांच्याबद्दल भाजपच्या नुपूर शर्मा, नवीन जिंदाल यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटले. औरंगाबाद, अहमदनगर, सोलापूरहसह अनेक ठिकाणी मुस्लिम संघटनांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. त्यांनी शर्मा आणि जिंदाल यांना अटक करण्याची मागणी केली.
मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी नुपूर शर्मा यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी सोलापूरमध्ये एमआयएमच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. नुपूर शर्माला अटक करा, अशी मागणी करत हा मोर्चा काढण्यात आला. सोलापूरसह औरंगाबाद, अहमदनगरमध्येही नुपूर शर्मा यांच्या अटकेसाठी मुस्लिम बांधवांकडून आज बंदची हाक देण्यात आली.
भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी एका खासगी वृत्तवाहिनीच्या चर्चासत्रात पैगंबर मोहम्मद यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. याचे पडसाद आखाती देशांतही उमटले आहे. आज सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आणि औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर एमआयएमकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी इम्तियाज जलीलसुद्धा उपस्थित होते. आंदोलनस्थळी शेकडो कार्यकर्ते उपस्थित झाल्याने दिल्ली गेट परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याकरता खुद्द पोलीस आयुक्तही उपस्थित होते. अहमदनगरमध्ये बंदची हाक देण्यात आली. अहमदनगर जिल्ह्यात मुस्लिम बांधवांनी बंदची हाक दिल्याने अनेक ठिकाणी शुकशुकाट होता. अत्यंत शांततेत हा बंद पाळण्यात आला.