उंचगाव : उंचगाव (ता. करवीर) येथील फासेपारधी वसाहतीमधील वीज ग्राहक अमिश काळे याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या वीज वितरण कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा व मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या संबंधित वीज अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे, अन्यथा जनआंदोलन उभारण्याचा इशारा करवीर शिवसेना व उंचगाव फासेपारधी समाज यांच्यावतीने देण्यात आला.

अमिश काळे फुप्फुसाच्या दुर्धर आजाराने त्रस्त होता. नुकतेच त्याच्यावर बेंगलोर येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. या कुटुंबाची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. त्यातच आजाराचा खर्च वाढल्याने वीज बिल थकीत राहिले. वीज बिल भरण्यासाठी वीज अधिकारी रामेश्वर कसबे व धनश्री नलवडे यांनी काळे कुटुंबाकडे बिल भरण्यासाठी तगादा लावला. अडचणीत असलेल्या कुटुंबीयांनी दोन जूनपर्यंत बिल भरण्यासाठी मुदत मागितली. पण त्याकडे दुर्लक्ष करून काळे यांचे वीज कनेक्शन तोडले. काळे यांच्यावर घरीच व्हेंटिलेटरवर उपचार सुरु होते. वीज तोडल्याने व्हेंटिलेटर बंद पडला व काळे यांना ऑक्सिजनचा पुरवठा झाला नाही. शेजारील घरात व्हेंटिलेटर लावला: पण वीज खंडित झाल्याने ऑक्सिजनअभावी काळे अत्यवस्थ झाले. रामेश्वर कसबे व धनश्री नलवडे या वीज अधिकाऱ्यांनी त्यांच्या घराची वीज तोडल्याने अगोदरच अत्यवस्थ झाले काळे यांच्यावर गंभीर स्थिती ओढवली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. काळे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सीपीआरमध्ये नेण्यात आला. त्यावेळी संबंधित रामेश्वर कसबे व धनश्री नलवडे यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका फासेपारधी समाजाने घेतली.
विजेअभावी एखाद्याला मृत्यू येणे, ही बाब गंभीर आहे. थकीत बिलासाठी इतका तगादा का लावला गेला? ही तर मार्चअखेर नव्हती. एखाद्या रुग्णास व्हेंटिलेटर लावला आहे, ही बाब संबंधित वीज अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घ्यायला हवी होती. मुदत मागितली असतानाही विज का तोडण्यात आली? वसुली होणे क्रमप्राप्त आहे; त्यात उचगावची वसुली समाधानकारक असताना काळे यांची विज का तोडली? थकित विज बिलाबद्दल त्यांना दंड झाला असता आणि त्यांनी तो भरला असता. पण वसुलीची ही खाजगी सावकारी पद्धत वीज वितरण कंपनीला अशोभनीय व निषेधार्ह आहे. सबब खासगी सावकारी प्रमाणे विजेचे बिल वसूल करणाऱ्या व त्यासाठी तगादा लावणार्या व काळे कुटुंबाची वीज तोडणाऱ्या रामेश्वर कसबे व धनश्री नलवडे या अधिकाऱ्यांच्या अक्षम्य कारवाईमुळे ऑक्सिजन न मिळाल्याने काळे यांना मृत्यूला सामोरे जावे लागले. संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल ताबडतोब करावा व त्यांना सेवेतून निलंबित करण्यात यावे; अन्यथा शिवसेनेला जनआंदोलन उभारावे लागेल असा इशारा यावेळी देण्यात आला.
या मागणीचे निवेदन करवीर शिवसेना व उंचगाव फासेपारधी समाज यांच्या वतीने वीज वितरण कंपनी, ग्रामीण विभाग २ चे कार्यकारी अभियंता सुनिल शिंदे, यांना देण्यात आले.
यावेळी करवीर शिवसेना व उंचगाव फासेपारधी समाज यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही तर पुढील जनआंदोलन संबंधित पोलीस स्टेशनच्या दारात करू असा इशारा वीज वितरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिला.
यावेळी अधिकारी शिंदे यांनी येत्या दोन दिवसात समिती नेमून घडलेल्या घटनेचा अहवाल तयार करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करू, असे आश्वासन करवीर शिवसेना व उंचगाव फासेपारधी समाज यांच्या शिष्टमंडळाला दिले.
यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उंचगावच्या लोकनियुक्त सरपंच मालुताई काळे, मा सरपंच गणेश काळे, उपतालुकप्रमुख पोपट दांगट, विभागप्रमुख दीपक रेडेकर, विनायक जाधव, संतोष चौगुले, विक्रम चौगुले, विराग करी, संदीप दळवी, मधुकर चव्हाण, सचिन देशमुख,राजू काळे,सुरेश चव्हाण, दिलीप सावंत, योगेश लोहार, बाळासाहेब नलवडे, दीपक पोपटाणी, सुनील पारपाणी, अजित चव्हाण, बंडू घोरपडे, बाबुराव पाटील व उंचगाव फासेपारधी समाजातील प्रतिनिधी आदी उपस्थित होते.
