मुंबई : ओबीसी राजकीय आरक्षणासाठी भाजपाकडून आज मंत्रालयावर मोर्चा काढण्यात आला. भाजपच्या मंबईतील कार्यालयापासून ते मंत्रालयापर्यंत मोर्चा काढला होता. ओबीसींचे राजकीय आरक्षण जाण्यासाठी राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. या मोर्चात मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते.
विधान परिषेदचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार व माजी कृषीमंत्री सदाभाऊ खोत आदी नेते या मोर्चात सहभागी झाले होते. मंत्रालयावर ओबीसी आरक्षणाविरोधातील मोर्चा आल्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. भाजप नेते योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला होता.
भाजपने ओबीसी आरक्षणावरुन आक्रमक भूमिका घेतली आहे. महाविकास आघाडीविरोधात भाजपडून मोर्चा काढण्यात आला होता. मंत्रालयावर मोर्चा धडकल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले. राज्य सरकारविरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा केली आहे. भाजप कार्यालयातील सर्व महत्त्वाच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. भाजप कार्यालयाकडून मंत्रालयाच्या दिशेने मोर्चा निघाला होता. यादरम्यान पोलिसांनी मध्येच मोर्चा अडवण्यात आला होता. पोलिसांकडून मोर्चा थांबवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनाही पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे