मुंबई : संभाजीराजे यांना राज्यसभेसाठी शिवसेना तसेच महाविकास आघाडीकडून पाठिंबा न मिळाल्याने संभाजीराजे यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. संभाजीराजे यांच्या समर्थकांकडून शिवसेनेला इशारा दिला आहे. याबाबतच पोस्टर व्हायरल होत असून संभाजीराजे आता केवळ राज्यसभाच नाही तर संपूर्ण राज्यच घेणार. इतिहासाची पुनरावृत्ती होणार, महाराष्ट्रात स्वराज्याची निर्मिती, लक्ष २०२४” असा मजकूर त्यावर छापला आहे.
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेले संभाजीराजे छत्रपती यांना पाठिंबा मिळालेला नाही. दरम्यान, राष्ट्रवादीने संभाजीराजे यांना शिल्लक मते देण्याचे म्हटले होते. मात्र, त्यानंतर घुमजाव करत शिवसेना ज्याला पाठिंबा देईल, त्यालाच मते देण्यात येतील असे राष्ट्रवादीने जाहीर केले. त्यामुळे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले संभाजीराजे छत्रपती यांची कोंडी झाली आहे. शिवसेनेशी संभाजीराजे यांची चर्चा सुरु होती. मात्र, शिवसेनेने शिवबंधनाची अट टाकल्यानंतर संभाजीराजे यांना ती अट मान्य नव्हती. त्यामुळे त्यांना राज्यसभेत जाण्याचा मार्गात अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे संभाजीराजे समर्थकांकडून एक फोटो व्हायरल करण्यात आला आहे. या फोटोत आता राज्यसभा नव्हे तर संपूर्ण राज्यच घेणार, असं लिहिले आहे. फोटोत इतिहासाची पुनरावृत्ती, राज्यात स्वराज्याची निर्मिती, आता लक्ष २०२४ असं लिहिण्यात आले आहे. यामुळे संभाजीराजे पुढे कोणती भूमिका घेणार,ते अपक्ष लढण्याच्या निर्णयावर ठाम राहणार का? त्यांची पुढची रणनीती काय असेल, अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
दरम्यान, खासदार संजय राऊत यांच्या विरोधात मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला आहे. संभाजीराजे यांच्या अपक्ष राज्यसभा उमेदवारीला संजय राऊत विरोध करत आहेत. राऊत यांचा सत्तेचा माज शिवप्रेमी जनता उतरवेल. एकीकडे प्रियांका चतुर्वेदी, उर्मिला मातोंडकर यांना अटी शर्थी न टाकता राज्यसभेवर पाठविण्याची तयारी दाखवता. मात्र ज्या छत्रपतींच्या नावावरती एवढी वर्षे राजकारण करत आहात एवढी वर्ष सत्ता भोगत आहेत. या शिवसेनेचा शिव आमच्या छत्रपतींचा आहे, अशी टीकाही मराठा क्रांती मोर्चाने केली आहे.