मुंबई : स्वतः थोरले शाहू महाराज यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. काँग्रेसकडूनही त्यांनी निवडणूक लढवली. मालोजीराजे यांनीसुद्धा काँग्रेसकडून निवडणूक लढली ते आमदार होते. स्वतः संभाजीराजे छत्रपती हेसुद्धा राष्ट्रवादीकडून लोकसभा निवडणूक लढले आहेत. त्यामुळे राजकीय पक्षात छत्रपतींच्या घराण्यातील कोणी जात नाही हा जो त्यांच्या समर्थकांचा दावा चुकीचा आहे. शिवसेनेचा उमेदवार होण्याची ऑफर दिली होती. परंतु त्यांनी नकार दिल्यामुळे जिल्हा प्रमुख संजय पवार यांना उमेदवारी देण्यात आल्याचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.
राऊत म्हणाले, देशभरातील अनेक प्रमुख राजवंशाचे घराणे कुठल्या ना कुठल्या पक्षात राहून आपले काम करत आहेत. आम्ही ४२ मत देऊन राज्यसभेवर पाठवण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. त्यासंदर्भात चर्चा झाली होती. परंतु त्यांच्या समर्थकांनी १५ दिवसांच्या घडामोडी समजून घेतल्या पाहिजेत. संभाजीराजे यांनी शिवसेनेचे उमेदवार व्हावं अशी शिवसेनेची भूमिका होती. त्यांना राजकीय पक्षाचे वावडं नाही असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच राजेंच्या समर्थकांनी मागील १५ दिवसांचा घटनाक्रम पाहिला पाहिजे, असा सल्लासुद्धा संजय राऊत यांनी दिला आहे. शिवसेनेच्या कोट्यातील एक जागा आम्ही संभाजीराजे छत्रपती यांना द्यायलाय तयार आहोत. तो छत्रपतींचा सन्मान राखण्यासाठी आणि घराण्याचा सन्मान राखण्यासाठी शिवसेना काय करु शकते हे त्यांनी सांगावे. ४२ मतांचा कोटा निवडणुकीसाठी लागतो, ही ४२ मतं आम्ही संभाजीराजे छत्रपती यांना देण्यासाठी तयार होतो. परंतु आमची भूमिका होती अट नाही तर भूमिका इतकीच होती की, आपण शिवसेनेचे उमेदवार व्हा, छत्रपती किंवा त्यांच्या कुटुंबाला राजकीय पक्षाचे वावडं असण्याचे कारण नाही, असे संजय राऊत म्हणाले आहेत.