मुंबई : शिवसेनेकडून राज्यसभा निवडणुकीच्या सहाव्या जागेसाठी कोल्हापूरचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. शिवसेनेकडून पवार यांच्या नावाची अधिकृत घोषणा खासदार संजय राऊत यांनी केली.
छत्रपती संभाजीराजे यांनी अपक्ष उमेदवारी जाहीर करत सर्वपक्षीयांनी आपल्याला पाठिंबा द्यावा अशी भूमिका घेतली होती. त्यांनी शिवसेनेकडेही मदत मागितली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संभाजीराजे छत्रपती यांच्यात एक बैठकही पार पडली होती. मात्र, संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेत प्रवेश करत शिवबंधन बांधावे आणि मगच उमेदवारी जाहीर करवी. शिवसेना त्यांना पाठिंबा देईल. ते शिवसेनेच्या तिकीटावर खासदार होऊ शकतात, अशी शिवसेनेची भूमिका होती. शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम होती.
दरम्यान, संभाजीराजे छत्रपती यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले की, ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी सविस्तर चर्चा झाली आहे. पुढे काय करायचं, ते सविस्तर ठरलेलं आहे. मला पूर्ण विश्वास आहे की ते त्याप्रमाणे करतील. मला हाही विश्वास आहे की ते छत्रपती घराण्याचा सन्मान करतील’. संभाजीराजे छत्रपती यांच्या विधानामुळे मुख्यमंत्री आणि छत्रपती संभाजीराजे यांच्यात नेमके काय ठरले आहे याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. असे असतानाच कोल्हापूरचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांचे नाव पुढे आले आहे.
संजय पवार कोण आहेत?
संजय पवार हे कोल्हापूरचे शिवसेना जिल्हा प्रमुख आहेत. पाठीमागील 30 वर्षे ते शिवसेनेत सक्रीय आहेत. कट्टर शिवसैनिक अशी त्यांची ओळख आहे. 1989 मध्ये शिवसेनेत प्रवेश केल्यापासून ते कट्टर शिवसैनिक आहेत. कोल्हापूर महापालिकेत ते तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. सर्वसामान्यांच्या बाजूने सर्वसामान्यांचे प्रश्न मांडणारा नगरसेवक अशी त्यांची ओळख होती. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.