ओबीसी आरक्षण रद्द होण्याचे पाप मंत्री मुश्रीफ, राज्य सरकारचे : समरजितसिंह घाटगे

कागल (प्रतिनिधी) : मंत्री हसन मुश्रीफ व राज्य सरकारने दाऊदशी संबंध असणाऱ्या नवाब मलिक यांची पाठराखण करण्यासाठीचा वेळ ओबीसी आरक्षणासाठी, इंपेरिकल डाटा न्यायालयात सादर करण्यासाठी दिला असता तर ओबीसी आरक्षण वाचले असते. त्यामुळे ओबीसी आरक्षण रद्द होण्याचे पाप मंत्री हसन मुश्रीफ व राज्य सरकारचे आहे, अशी घणाघाती टीका शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केली.

    कागल येथील प्रभाग क्रमांक एक व पाचमधील ( वडवाडी येथील) नागरिकांना ई श्रम कार्ड वाटप कार्यक्रमावेळी ते बोलत होते.

  घाटगे म्हणाले, महाराष्ट्र व मध्यप्रदेश या दोन राज्यांना कोर्टाने एकाचवेळी ओबीसी आरक्षणासाठी ईंपीरिकल डाटा सादर करणेबाबत आदेश दिले होते. मात्र महाविकास आघाडी सरकारने नवाब मलिक यांना वाचविण्यासाठीचा वेळ जर हा डाटा सादर करण्यासाठी दिला असता तर मध्यप्रदेशप्रमाणे महाराष्ट्राचेही ओबीसी आरक्षण वाचले असते. त्यामुळे ओबीसी आरक्षण रद्द होण्यास महाविकास आघाडी सरकारच कारणीभूत आहे. राष्ट्रद्रोहाच्या आरोपाखाली कोठडीत असलेले राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ पुरोगामीत्वाचा बुरखा पांघरलेले ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ हे नबाब मालिकांच्या समर्थनात कोल्हापूर व कागल येथे मोर्चा आंदोलन काढण्यासाठी वेळ देतात. पण ओबीसी आरक्षणासाठी ते कधीही रस्त्यावर उतरले नाहीत किंवा विधानसभेत  अवाक्षरही काढलेले नाही. हे दुर्देवी आहे.

यावेळी नगरसेविका सौ. विजया निंबाळकर,बंडा बारड, अशोक वड्ड, महेश भोसले, प्रविण कुराडे, हिदायत नायकवडी यांनीही मनोगत व्यक्त केले. स्वागत सचिन मोकाशी यांनी तर आभार  बाळ मकवाने यांनी मानले. या कार्यक्रमाला नगरसेविका आनंदी मोकाशी, हौसाबाई धुळे, सुमन कुराडे, संगिता पोवार, रेवती बरकाळे, सतीश पाटील, राजेंद्र जाधव, आप्पासो हुच्चे, उमेश सावंत, सुशांत कालेकर, गजानन माने, सचिन निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

फरक दोन गटाच्या नगरसेवकांमधील यावेळी युवक कार्यकर्ते बंडा बारड म्हणाले, आजपर्यंत नागरपालिकेवर निवडून गेलेल्या  नगरसेवकांची पाश्वभूमी पाहता राजे गटाच्या नगरसेवक झालेल्या कार्यकर्त्यांची परिस्थिती आहे तशीच आहे. कारण ते भ्रष्ट्राचार विरहित प्रामाणिकपणे जनसेवा करतात. मात्र विरोधी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गटाकडून एकदा जरी नगरसेवक झाला तरी ते अलिशान गाडीतून फिरतात. त्यांच्याकडे ही आर्थिक सुबत्ता कुठून येते. हे जनतेनेच पहावे.