हसन मुश्रीफ यांच्या बेनामी संपत्तीवर लवकरच कारवाई : किरीट सोमय्या

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या बेनामी संपत्तीवर लवकरच कारवाई सुरु करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी दिली.

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या बेनामी संपत्तीवर टाच येणार असल्याचा इशारा दिला आहे. सोमय्या म्हणाले की, हसन मुश्रीफ यांच्यावर बेनामी मालमत्ता प्रकरणी कारवाई सुरु झाली आहे. हसन मुश्रीफ यांनी १५८ कोटी रुपयांचे मनी लाँड्रिंग केले. रजत कंज्यूमर सर्विसेस, मरुभूमी फायनान्स अँड डेव्हलपमेंट प्रा. लि., नवरत्न असोसिएट यासह आणखी दोन कंपन्यांमध्ये १५८ कोटींचे मनी लाँड्रिंग झाले आहे. आयकर विभागाने बेनामी मालमत्ताप्रकरणी कायदेशीर कारवाई सुरु केली आहे. दोन कंपन्यांना दिलेल्या नोटीसीची मुदत संपली आहे. आता ती मालमत्ता बेनामी घोषित करुन त्याच्या अटॅचमेंटची कारवाई सुरु केली आहे.

सोमय्या म्हणाले, शरद पवार तुम्ही शेतकरी शेतकरी करता मग सांगा हसन मुश्रीफ यांना हा प्रश्न कधी विचारणार की, तुम्ही सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यामध्ये शेतकऱ्यांशी खोटं बोलून ४० हजार शेतकऱ्यांच्या नावाने हसन मुश्रीफ परिवाराच्या संस्थेमध्ये १६ कोटी ३१ लाख ९३५०० रुपये एवढे जमा केले आहेत. त्यांच्या परिवाराची बिल्डर डेव्हलपर्स कंपनी आहे आणि त्याच्या मार्गातून सरसेनापती कारखाना आहे. कुठल्याही कंपनीला २० पेक्षा जास्त लोकांकडून पैसे जमवायचे असेल तर सेबीची परवानगी घ्यावी लागते. शेतकऱ्यांचे पैसे आहेत का त्यांच्या नावाने पैसे जमा करण्यात आले आहेत याचे सर्वेक्षण सुरु आहे.