कोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी माझी चर्चा झाली आहे. काय करायचे आहे ते सविस्तरपणे ठरले असून मला विश्वास आहे की ते त्याप्रमाणे करतील. मुख्यमंत्री छत्रपती घराण्याचा सन्मान करतील, असा विश्वास संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केला. आज सकाळी ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.

राज्यसभा निवडणूक अपक्ष लढण्याची घोषणा केल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दोन वेळा भेट घेतली. त्यावेळी त्यांनी आपल्याला पाठिंबा देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. मात्र, संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश करावा आणि शिवसेनेकडून राज्यसभा निवडणूक लढवावी असा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी ठेवला होता. त्याला त्यानंतर संभाजीराजे यांनी नकार देत काल थेट कोल्हापूर गाठले होते. या पार्श्वंभूमीवर आज त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यामुळे संभाजीराजे यांच्या उमेदवारीबाबत आज पूर्णविराम मिळण्याची शक्यता असून संभाजीराजे यांच्या उमेदवारीबाबत आज पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. संभाजीराजे काही केल्या शिवबंधन बांधणार नाहीत अशी माहिती सुत्रांकडून मिळत आहे. महाविकास आघाडीची अपक्ष उमेदवारी मिळावी यासाठी संभाजीराजे प्रयत्नशील आहेत. तसं झालं नाही तर शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार म्हणून संभाजीराजे हे उमेदवारी घेणार असल्याची माहिती मिळत आहे.
