दोनवडे (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील खुपिरे ग्रामपंचायतीनेही पुरोगामी पाऊल टाकत विधवा प्रथा झुगारण्याचा निर्णय घेतला आहे. मासिक सभेत विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. सरपंच दिपाली रमेश जांभळे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. विधवा प्रकार बंद करण्याचा निर्णय घेणारी खुपिरे ही जिल्ह्यातील ग्रामपंचायत ठरली आहे.
मासिक सभेत ग्राम विकास अधिकारी कृष्णात गुरव यांनी विधवा प्रथे विरोधातील महाराष्ट्र शासनाचा निर्णय सभेत मांडला. त्यानंतर सभेत विधवा प्रथेच्या विरोधात सविस्तर चर्चा करण्यात आली. सर्वानुमते गावात विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला जिल्ह्यातील हेरवाड, माणगाव ग्रामपंचायतीनंतर विधवा प्रथेविरोधात ठराव करणारी खुपिरे ही जिल्ह्यातील तिसरी ग्रामपंचायत ठरली आहे.
याबाबत सरपंच दिपाली जांभळे म्हणाल्या, विधवा महिलांना इतर महिलांप्रमाणे सन्मानाने जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र विधवा प्रथांचे पालन होत असल्याने महिलांना प्रतिष्ठेचे जीवन जगण्याच्या आणि त्यांना मिळालेल्या संवैधानिक अधिकाराचे उल्लंघन होत होते. त्यामुळे भविष्यात स्त्रियांच्या अधिकाराचे हनन होऊ नये म्हणून गावातील सर्व विधवा महिलांना एकत्र करून ग्रामपंचायतमध्ये १५ महिलांची समिती तयार करण्यात येणार आहे. या सर्व महिलामार्फत गावांमध्ये विधवा प्रथा बंद करण्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे.
या सभेला उपसरपंच युवराज पाटील, सदस्य सागर पाटील, भगवान हराळे, अमर कांबळे, तानाजी पाटील, युवराज पाटील, सचिन कुंभार, शीलाताई चौगुले, संगीता कांबळे, तृप्ती पाटील, शुभांगी पाटील, कल्पना कोळी, वनिता कांबळे, रेखाताई सुतार आदी उपस्थित होते.
एक वर्षाचा घरफाळा, पाणीपट्टी माफ; स्वातंत्र्यदिनी २५०० रुपये देऊन सन्मान
गावातील जे कुटुंब विधवा प्रथा बंद करून त्याची अंमलबजावणी करतील अशा कुटुंबाचा एक वर्षाचा घरफाळा व पाणीपट्टी माफ करण्यात येणार आहे. तसेच स्वातंत्र्यदिनी त्यांना सन्मानपत्र व २५०० रुपये रोख अनुदान देऊन सन्मानित करण्यात येणार आहे असे सरपंच दिपाली जांभळे यांनी सांगितले.