संभाजीराजेंना आमचा विरोध नाही, पण अपक्षाला पाठिंबा नाही : संजय राऊत

मुंबई : शिवसेना राज्यसभेच्या दोन्ही जागा लढवणार आहे. युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेत यावे, अशी शिवसेनेची भूमिका आहे. संभाजीराजेंना आमचा विरोध नाही परंतु आम्ही अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देणार नाही, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.

राऊत म्हणाले की, शिवसेना दोन जागा लढवणार आहे. दोन जागा लढवणं हा राजकीय अपराध नाही. शिवसेना राजकीय पक्ष आहे. मराठी माणुस आणि हिंदुत्वाचे फार मोठी संघटना आहे. शिवसेना राजकारणात अनेक वर्ष आहे. महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. अशा वेळेला जेव्हा राज्यसभेच्या निवडणुका ६ जागांसाठी होत आहेत. त्यातील २ जागा शिवसेना लढत आहे. दोन्ही ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार आम्ही देऊ आणि निवडून आणू अशी शिवसनेची भूमिका असल्याचे राऊतांनी सांगितले आहे.

संभाजीराजे छत्रपती यांनी अपक्ष लढण्याची घोषणा केली आहे. एखादा उमेदवार मी लढणार असे जाहीर करतो तेव्हा त्यांच्याकडे निवडून येण्यासाठी लागणाऱ्या मतांची व्यवस्था त्यांनी केली असावी. त्यांनी विजयी होण्यासाठी ४२ मतांची व्यवस्था केली असावी. त्यांना कोणीतरी पाठिंबा देत असेल अशा वेळी त्यांच्यात पडण्याची गरज नाही. ते स्वतंत्र व्यक्तिमत्व आहेत. पंरतु असे कळतं आहे की, त्यांच्याकडे मत नाहीत. आता आम्ही कसे मत देणार, आम्हाला शिवसेनेचा उमेदवार निवडून आणायचा आहे. अपक्ष नाही. आम्ही अपक्षाला पाठिंबा देणार नाही मग ते कोणीही असो, शिवसेनेचा उमेदवारच राहील. आम्ही संभाजीराजेंना सांगितले शिवसेनेत या आणि शिवसेनेचे उमेदवार व्हा, राज्यसभेत एक शिवसेनेचा खासदार वाढवणं गरजेचे आहे. तुम्ही थोडं एक पाऊल पुढे या आम्ही दोन पाऊलं मागे जाऊ परंतु निर्णय त्यांचा आहे.