…म्हणून अयोध्या दौरा रद्द केला; राज ठाकरेंनी सांगितलं ‘राज’कारण

पुणे : ‘मी अयोध्या दौरा जाहीर केला आणि माझ्यावर टीका होऊ लागली. हा सगळा सापळा असल्याचे लक्षात आलं. माझ्या अयोध्या दौऱ्याच्या विरोधाची रसद महाराष्ट्रातून पुरवली गेली. मला अयोध्येला येऊ देणार नाही, अशा वल्गना काही जण करत होते. अगदी मुंबई, दिल्ली, उत्तरप्रदेश… पण हा सगळा ट्रॅप होता. आपण या ट्रॅपमध्ये फसायला नको हे माझ्या वेळीच लक्षात आले म्हणून दौरा स्थगित केल्याचे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले.

पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते. अयोध्या दौऱ्याला भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध केला होता. हा दौरा स्थगित का केला, याबाबत काय राजकारण शिजलं हे राज ठाकरे यांनी सांगितले.

राज ठाकरे म्हणाले, ‘प्रभू रामचंद्रांच्या दर्शनासोबतच कारसेवकांना मारल्यानंतर शरयू नदी मृतदेह टाकण्यात आले होते. त्याचे दर्शन मला घ्यायचे होते. जर मी अयोध्येत गेलो असतो आणि तिथे काही झालं असतं, तर माझ्या कार्यकर्यांवर गुन्हे दाखल झाले असते. माझे कार्यकर्ते मी हकनाक घालवणार नाही. तिकडे केसेस टाकल्या गेल्या असत्या. ‘एक कोणी तरी खासदार उठतो आणि मुख्यमंत्र्यांना आवाहन देतो हे शक्य आहेत आहे का? माझ्यावर टीका होणार असेल तरी चालेल पण कार्यकर्ते अडकू देणार नाही,’ असे राज ठाकरे म्हणाले.

उगाच भिजत भाषण का करायचं?
निवडणुकाच नाहीत तर उगाच भिजून का भाषण करायचे? सध्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. म्हणून नदी पत्रातील सभा रद्द केली, असा टोला राज ठाकरे यांनी शरद पवार यांचे नाव न घेता टोला लगावला.

राज ठाकरे म्हणाले की, ‘मशिदीवरील अनधिकृत भोंगे हटवा ही मागणी आम्ही केल्यानंतर ते राणा दाम्पत्य उठलं आणि मातोश्री समोर हनुमान चालीसा म्हणायचा हट्ट केला. अरे मातोश्री समोर हनुमान चालीसा म्हणायला ती काय मशीद आहे का?, असा सवाल करत राज ठाकरे यांनी राणा दाम्पत्याला जोरदार टोला लगावला.तसेच, राणा विरुद्ध शिवेसना यांच्यात झालेल्या शाब्दीक युद्धावरुन, अटकेच्या प्रकरणावरुन, हिंदुत्त्वावरुन आणि लडाखमधील गोड भेटीवरुन शिवसेना आणि राणा दाम्पत्यावर टिका केली. शिवसेनेनं मोठा विरोध केला, राणा दाम्पत्यास मग अटक झाली. अटकेनंतर मधु इथं आणि चंद्र तिथं असं आपल्याला पाहिलं मिळाला. एवढा मोठं आंदोलन नाट्य झालं आणि ते तिथं लडाखमध्ये हातात हात घालून फिरतात. ते तिथं एकाच पंगतीत जेवतात, असे म्हणत राज ठाकरेंनी हे सगळे नाटकं करत असल्याचं म्हटलं.

उद्धव ठाकरे यांच्या अंगावर आंदोलनाची एक तरी केस आहे का? हिंदुत्व किंवा मराठीच्या मुद्द्यावरून त्यांनी आजपर्यंत एकतरी भूमिका घेतली आहे का? दरवेळी उद्धव ठाकरे केवळ १९९३ च्या दंगलीची आठवण काढतात. मुंबईच्या सभेत तर ते औरंगाबादच्या नामांतराची गरजच काय, असेही बोलले. पण उद्धव ठाकरे आहेत तरी कोण? तुम्ही महात्मा गांधी किंवा वल्लभभाई पटेल आहात का?, असा शब्दांत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले.