मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ५ जून रोजीचा अयोध्या दौरा प्रकृती अस्वस्थामुळे स्थगित करण्यात आला आहे. राज ठाकरे यांच्या पायाला दुखापत झाली होती. पायाच्या दुखण्यानं पुन्हा एकदा डोकं वर काढल्यामुळे डॉक्टरांचा सल्ल्यानुसार त्यांनी अयोध्या दौरा स्थगित केल्याचं सांगितलं जात आहे. राज ठाकरेंनी त्यांच्या ट्विटर हँडलवर अयोध्या दौरा स्थगित केल्याची माहिती दिली आहे.
राज ठाकरेंनी अयोध्या दौऱ्याची घोषणा केल्यानंतर मनसैनिकांनी जय्यत तयारीला सुरुवात केली होती. पण उत्तर प्रदेशातून राज यांच्या दौऱ्याला कडाडून विरोध करण्यात आला. भाजपाचे खासदार बृजभूषण चरण सिंह यांनी राज ठाकरेंनी आधी उत्तर भारतीयांची माफी मागावी त्यानंतरच अयोध्येला यावं अशी मागणी केली. बृजभूषण सिंह यांनी याच पार्श्वभूमीवर मोठं शक्तीप्रदर्शन देखील केलं. तसंच ५ जून रोजी अयोध्येत राज ठाकरेंना येऊ देणार नाही. त्यासाठी ५ लाख लोक राज ठाकरेंना अडवतील असं म्हणत बृजभूषण सिंह यांनी शड्डू ठोकला आहे. त्यानंतर राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर ठाम होते.
पुण्यात २२ मे रोजी सभा होणार
पुण्यात २१ मे रोजी नदीपात्रात होणारी मनसेची जाहीर सभा देखील पावसाच्या शक्यतेमुळे रद्द करण्यात आली होती. पण आता ही सभा २२ मे रोजी सकाळी १० वाजता गणेश कला मंच येथे होणार असल्याची माहिती मनसेकडून देण्यात आली आहे. याच सभेत आता राज ठाकरे अयोध्या दौरा स्थगित का केला याची माहिती देणार आहेत.