कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराजांनी राबविलेल्या कृषी विषयक निर्णयांची अंमलबजावणी करून त्यांना मानवंदना देण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील श्री शाहू छत्रपती मिलमध्ये दि. २० ते २२ मे २०२२ दरम्यान सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत सर्वांसाठी मोफत भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले असून या कृषी प्रदर्शनात पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.
प्रदर्शनात ३00 हून अधिक स्टॉल्स : येथील कृषी प्रदर्शनात ३00 हून अधिक स्टॉल्स, शेती तज्ज्ञांचे मार्गदर्शक सेमिनार्स, प्रात्यक्षिके, स्लाईड-शोज अशा अनेक गोष्टीतून उपयुक्त असे हे कृषी प्रदर्शन संपन्न होत आहे. यामध्ये राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय कंपन्यांची खते, बियाणे, सिंचन, औजारे तसेच शेती पुरक उत्पादनांचे स्टॉल्स असणार असून शेतीविषयक संपूर्ण माहिती प्रात्यक्षिक व मॉडेलच्या माध्यमातून एकाच ठिकाणी मिळण्याची सुवर्णसंधी येथे लाभत आहे.
महिला बचतगटांना प्रोत्साहन- प्रदर्शनात महिला बचत गटांसाठीही स्टॉल्स उपलब्ध असून त्याव्दारे महिलांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आहे. तसेच त्यांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याचा हा प्रयत्न आहे. यामुळेच या प्रदर्शनात आपण सहभागी होऊन आपल्या उत्पादनाला हजारो शेतकरी बांधवांपर्यंत पोहचण्याच्या संधीचे सोने करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी निमित्ताने केले आहे.
अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती- येथील शेतकऱ्यांनी आधुनिक पध्दतीचा वलंब करुन जास्तीत जास्त उत्पादन कसे घ्यावे, यासाठी प्रयोगशील व प्रगतशील शेतकऱ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपसातील विचारांची देवाणघेवाण करण्यास व्यासपीठ उपलब्ध करून दिल्यास त्यांच्यातील आत्मविश्वास वृद्धिंगत होऊ शकतो. कृषीक्षेत्रामध्ये विकसित झालेले आधुनिक तंत्रज्ञान, प्रगतीशील शेतकऱ्यांच्या माध्यमातून निर्माण झालेल्या यशोगाथा, शासनाच्या विविध विभागाच्या योजना, उपक्रमांची माहिती अद्ययावत कृषि तंत्रज्ञान, नाविन्यूपर्ण प्रयोगशील शेतकऱ्यांचे अनुभव, बाजारपेठ व्यवस्थापन, कृषीपूरक व्यवसाय इ. बाबत मार्गदर्शन उपलब्ध व्हावे व प्रत्यक्ष तंत्रज्ञान, आधुनिक शेती उपयोगी मशिनरी प्रत्यक्ष पाहता यावी याचे प्रात्यक्षिक पाहता यावे याकरिता कृषि प्रदर्शन, कृषि विषयक परिसंवाद आणि अनुभवी शेतकरी व उद्योजकांची व्याख्याने, यशस्वी शेतकरी, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ व विचारवंत यांची थेट भेट घडावी व सामान्य शेतकऱ्यांना शंका निरसन करून घेता यावे, उत्पादक ते थेट ग्राहक विक्री या संकल्पनेवर आधारित धान्य महोत्सवाचेही आयोजन करण्यात आले आहे.
कृषि उत्पादनास आणि विपणनास चालना- कृषी विषयक विकसीत तंत्रज्ञान व शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या हेतूने कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकरी- शास्त्रज्ञ आणि संशोधन विस्तार – शेतकरी विपणन साखळी सक्षमीकरण, समूह गट संघटीत करून स्थापित शेतकरी उत्पादक कंपन्यांची क्षमता बांधणी करणे. शेतकऱ्यांच्या उत्पादनास योग्य भाव मिळावा, ग्राहकांना उच्च दर्जाचा माल मिळावा याकरिता शेतकरी ते ग्राहक थेट विक्री श्रृंखला विकसित करणे. कृषि विषयक परिसंवाद / व्याख्याने यांचे माध्यमातून विचारांच्या देवाण-घेवाणीद्वारे शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करणे. विक्रेता खरेदीदार संमेलनाच्या माध्यमातून बाजाराभिमुख कृषि उत्पादनास आणि विपणनास चालना देणे.
कृषि महोत्सवातील उपक्रम : कृषि प्रदर्शन, परिसंवाद / चर्चासत्रे, सेंद्रिय धान्य महोत्सव (उत्पादक ते ग्राहक थेट विक्री), विक्रेता खरेदीदार संमेलन, शेतकरी व कर्मचारी सन्मान, सांस्कृतिक कार्यक्रम.