फडणवीसांनी सांगितलं तर सदाभाऊ साडी घालून नाचतील

मुंबई : केतकी चितळेची बाजू घेणाऱ्या सदाभाऊ खोत यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी टीकेची झोड उठवली आहे. सदाभाऊ खोत हे आमदारकीसाठी केतकीचं समर्थनच काय फडणवीसांनी सांगितलं तर साडी घालून सिग्नलवर पण नाचतील, अशी बोचरी टीका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांनी केली आहे.

अभिनेत्री केतकी चितळेने फेसबुकवर पोस्ट करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह टीका केली. केतकीने शरद पवारांवर खालच्या शब्दात टीका केल्यानंतर राजकीय नेत्यांसह सामान्य नागरिकांनीही संताप व्यक्त केला. केतकी चितळे ही कणखर आहे, तिला कोणाच्या समर्थनाची गरज नाही. तिने न्यायालयात वकील न देता स्वत:च स्वत:ची बाजू मांडली. त्यामुळे तिला मानावं लागेल, अशी प्रतिक्रिया रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी दिली. खोत यांचं हे वक्तव्य केतकीच्या समर्थनात होतं का? अशा चर्चा देखील सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्यानंतर सुरू झाल्या आहेत.