मुंबई : कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची तक्रार थेट काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे केली आहे. ते म्हणाले, राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हळूहळू महाराष्ट्रात काँग्रेसला कमकुवत करण्याचे काम करत आहे. राष्ट्रवादीने आपले मनसुबे न सुधारल्यास आगामी काळात काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेऊ शकते, असा इशारा नाना पटोले यांनी दिला आहे.
नाना पटोले म्हणाले, राष्ट्रवादीने सर्वप्रथम भिवंडीत काँग्रेसचे १७ नगरसेवक फोडले आणि त्यांना आपल्या पक्षात घेतलं. त्यानंतर अमरावतीतही पाठीत खंजीर खुपसला. भंडारा आणि गोंदियातही हा ट्रेंड दिसून आला. ते म्हणाले की, राष्ट्रवादी अप्रत्यक्षपणे भाजपला पाठिंबा देत आहे. या सर्व गोष्टी मी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना सांगितल्या आहेत.
नाना पटोले पुढे म्हणाले, महाविकास आघाडी सरकारची स्थापना किमान समान कार्यक्रमांतर्गत चालवण्यासाठी करण्यात आली आहे. पण दुर्दैवाने आता त्याचे पालन होत नाही. मैत्रीच्या नावाखाली राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसचा विश्वासघात करत आहे.