प्रत्येकवेळेस विषयांतर कशाला ? हिम्मत असेल तर स्पष्ट उत्तरं द्या : शौमिका महाडिक  


 कोल्हापूर : आज गोकुळ दूध संघामध्ये सत्ताधारी आघाडीच्या नेत्यांसह चेअरमन, संचालकांची पत्रकार परिषद पार पडली. मी पत्रकार परिषद घेत संचालिका म्हणून प्रतिनिधित्व करण्याची संधी दिल्याबद्दल मतदारांचे आभार मानले आणि वर्षपूर्तीनिमित्त संघातील सत्ताधाऱ्यांचा वर्षभराचा अनागोंदी कारभार  जनतेसमोर मांडला. संघामध्ये माझ्या प्रश्नांना उत्तरं दिली जात नसल्यानेच मी माझे प्रश्न नाईलाजास्तव त्या पत्रकार परिषदेमधून मांडले होते. त्यानंतर गोकुळ म्हणजेच जग समजून चार भिंतीच्या आत मनमानी कारभार करणारे हुकूमशहा अखेर आज जनतेसमोर आले. पण मी पत्रकार परिषदेत विचारलेल्या किंवा आज तिथे उपस्थित असणाऱ्या पत्रकारांनी विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाला समाधानकारक उत्तर ते देऊ शकले नाहीत. म्हणूनच मी पुन्हा एकदा त्यांना जाहीर सवाल करत असल्याचे गोकुळच्या संचालिका सौ शौमिका महाडिक यांनी सांगितले.
 

शौमिका महाडिक म्हणाल्या, माझे प्रामुख्याने 10  साधे प्रश्न  आहेत. हिम्मत असेल तर त्याची स्पष्ट उत्तरं द्यावीत.
1) 2017 साली सतेज पाटील सातत्याने विचारायचे की, ग्राहकांवर दरवाढ लादून खरेदी दर का वाढवले. मग आता तुम्ही काय जगावेगळं कर्तृत्व गाजवलं ?
2) त्यातही विक्री दरात वाढ किती केली ? आणि मोबदला म्हणून शेतकऱ्यांना किती रुपये दिले ?
3) आधी पुणे-मुंबई त्यानंतर इतर विभाग आणि शेवटी उत्तरच्या निवडणुकीनंतर कोल्हापूर मध्ये दरवाढ केली. या सगळ्या गोंधळात किती फायदा आणि तोटा झाला ? याचा सविस्तर लेखाजोखा ते का मांडत नाहीत ?
4) आज एकीकडे ते म्हणत होते की आम्ही वचनपूर्ती केली आणि दुसरीकडे अभिमानाने सांगत होते की ग्राहकांवर भार टाकला. नेमकं यांनी दिलेलं वचन काय होतं याचं भान त्यांना आहे का ?
5) त्यांनी आज म्हटल्याप्रमाणे महाडिक साहेबांची 25 वर्षे सत्ता होती, पण महाडिक साहेबांनी स्वतःच्या हक्काच्या तालुक्यांमध्ये 25 वर्षात किती मतदान वाढवलं ? त्या तुलनेत आज एका वर्षात आपण किती नव्या डेअरीना मंजुरी दिली आहे ? त्यामध्ये कोणकोणत्या तालुक्यांची संख्या जास्त आहे ? आणि जर खरंच नवीन डेअरी होत आहेत तर त्या तुलनेत सदर तालुक्यांमधून संकलन किती वाढलं ? आजपर्यंत शेतकऱ्यांच्या मालकीचा राहिलेला दूध संघ 5 वर्षात घशात घालण्याचं नियोजन यामागे आहे का ? 
6) टँकरच्या वाहतुकीत 5 कोटींची बचत केली म्हणणाऱ्याना ती बचत शक्य झाली कारण जुने ठेकेदार कमी दरात वाहतूक करत होते. नवीन ठेका देण्याचा घाट घातल्यानंतर नवे दर काय दिले आहेत? त्यामध्ये कोणाच्या मालकीचे किती टँकर असणार आहेत? आणि ते जुन्या दराने वाहतूक करणार का ? ठेका बदलताच एका दिवसात वाहतूक दरात वाढ द्यायला डिझेलची किंमत एका दिवसात वाढली का?        
7) वासाचे दूध कमी झाले म्हणताय तर त्या वासाच्या दुधाची मागील 3 वर्षांची तुलनात्मक माहिती का जाहीर करत नाही ? 
8) उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या नादात आणि इतर वैयक्तिक लाभ मिळवायच्या नादात बाहेरील जिल्हे आणि कर्नाटक येथून किती संकलन वाढवले त्याची आकडेवारी जाहीर करा. आणि त्या दुधामुळेच गोकुळच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे का ? हेही सांगा. जनतेला कळूदे संकलनात वाढ म्हणजे नेमकं काय सुरू आहे आणि त्याचा परिणाम काय होतोय. 
9) नुकत्या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत गोकुळचा विषय मी फार घेतला नाही. पण दक्षिणच्या वेळेस सतेज पाटील यांनी केलेली सर्व भाषण माझ्याकडे उपलब्ध आहेत. तेव्हा हाच सल्ला त्यांना द्यावा असं मुश्रीफ साहेबांना वाटलं नाही का ? बरं, मी तरी सन्मान ठेऊन बोलते, त्यांची भाषणं ऐकली तर स्वतःच्या गुरूला एकेरी बोलणाऱ्या या व्यक्तीबद्दल डोक्यात तिडीक जाते. त्यांना मुश्रीफ साहेब खरंच प्रामाणिकपणे काय सल्ला देतील ? 
10) आज मी रीतसर मुद्द्याला धरून प्रश्न विचारल्यावर संघाची बदनामी होत असेल तर मागचे 10 वर्षं सतेज पाटील पातळी सोडून निरर्थक टीका करायचे तेव्हा ते संघाचा लौकिक वाढवायचं काम करत होते का ?
 
याव्यतिरिक्त अजून बऱ्याच गोष्टी आहेत बोलण्यासारख्या.. पण हळूहळू एकेका विषयावर मी योग्य वेळी बोलेन. 
तूर्तास एवढ्याच 10 प्रश्नांची उत्तरं त्यांनी द्यावीत तसेच हिम्मत असेल तर मी आजपर्यंत रीतसर पत्रांद्वारे विचारलेल्या प्रश्नांची लेखी उत्तर द्यावीत. आणि मग खुशाल स्वतःची पाठ थोपटून घ्यावी.  जर खरंच वर्षाभरात चांगला कारभार केला असता तर तुमचा जाहीर सत्कार आम्हीच केला असता आणि तेवढं मोठं मन महाडिकांकडे आहे, हे संपूर्ण कोल्हापूर जिल्हा जाणतो. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी सोंग करत बसण्यापेक्षा किमान इथून पुढेतरी स्वतःपेक्षा संघाच्या हिताला प्राधान्य द्यावं. मुद्देसूद, आकडेवाऱ्यांसह उत्तरा असेल तर मी आजपर्यंत रितसर पत्रांद्वारे विचारलेल्या प्रश्नांची लेखी उत्तर द्यावीत. आणि मग खुशाल स्वतःची पाठ थोपटून घ्यावी.  जर खरंच वर्षाभरात चांगला कारभार केला असता तर तुमचा जाहीर सत्कार आम्हीच केला असता आणि तेवढं मोठं मन महाडिकांकडे आहे, अशी गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी केली.