मुंबई : अभिनेत्री केतकी चितळे अभिनयासोबतच तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अनेकदा चर्चेत येते. केतकीने जेष्ठ नेते व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करत वादग्रस्त पोस्ट शेअर केली आहे.
केतकीने शरद पवारांबद्दल वादग्रस्त पोस्ट शेअर करत नव्या वादाला तोंड फोडलं आहे. तुका म्हणे पवारा नको उडवू तोंडाचा फवारा. ऐशी झाले आता उरक, वाट पाहतो नरक, अशी टीका केतकीने या पोस्टमध्ये केली आहे.
सगळे पडले उरले सुळे, सतरा वेळा लाळ गळे. समर्थांचे काढतो माप, ते तर तुझ्या बापाचेही बाप. ब्राम्हणांचा तुला मत्सर, कोण रे तू? तू तर मच्छर. भरला तुझा पापघडा, गप! नाहीतर होईल राडा. खाऊन फुकटचं घबाड, वाकडं झालं तुझं थोबाड. याला ओरबाड त्याला ओरबाड, तू तर लबाडांचा लबाड, अशी पोस्ट केतकी चितळेने शेअर केली आहे.
दरम्यान, शरद पवारांनी साताऱ्यातील एका भाषणात बोलताना कवितेच्या माध्यमातून हिंदू देवतांचे बाप काढल्याची टीका भाजपने केली होती. याच कवितेचा धागा पकडत केतकी चितळेने शरद पवारांवर टीका केली आहे. केतकी चितळेने खालच्या शब्दात शरद पवारांवर टीका केल्याने राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे.
कळवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
केतकी विरोधात ठाण्यातील कळवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. केतकीविरुद्ध कळवा पोलिस ठाण्यात कलम 500, 505(2), 501 आणि 153 A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे पदाधिकारी स्वप्निल नेटके यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान केतकीला अटक होण्याची देखील शक्यता आहे.