कोल्हापूर : इतिहासाचार्य वा. सी. बेंद्रे यांच्या सहा ऐतिहासिक ग्रंथाचा पुनर्प्रकाशन सोहळा रविवार, दि. १५ मे रोजी दसरा चौक येथिल छत्रपती शाहू स्मारक भवन येथे सकाळी ११ ते २ या वेळेत पार पडणार आहे. छत्रपती शाहू महाराज, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, डॉ. जयसिंगराव पवार आणि इतिहासाचार्य वा. सी. बेंद्रे यांच्या नात सौ. साधना बेंद्रे यांच्या हस्ते हा ग्रंथ प्रकाशन सोहळा होणार असल्याची माहिती डॉ. दामोदर नाईक, दुर्ग अभ्यासक भगवान चिले यांनी पत्रकार बैठकीत दिली.
महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच वेळी ६ ऐतिहासिक संदर्भ ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न होत आहे. यावेळी ‘मालोजीराजे आणि शहाजी महाराज’, ‘छत्रपती शिवाजी महाराज (पूर्वार्ध व उत्तरार्ध)’, ‘छत्रपती संभाजी महाराज’, ‘छत्रपती राजाराम महाराज’, ‘राजाभिषेकप्रयोग’ हे ग्रंथ मराठीदेशा फाउंडेशनतर्फे प्रकाशित होणार आहेत. प्रकाशित होणारी सहा पुस्तके पूर्णपणे नव्या रूपात, काही मूळ पत्रांसहित (मूळ मोडी पत्रांची छायाचित्रे आणि मराठी लिप्यंतरासहित) आणि क्राऊन (मोठ्या) साईजमध्ये प्रकाशित होत आहेत. या सहा पुस्तकांपैकी एक असलेले ‘छत्रपती राजाराम महाराज’ हे दुर्मिळ पुस्तकं जवळ जवळ ५० वर्षांनी परत एकदा नव्याने प्रकाशित होत आहेत. या ग्रंथाच्या मुखपृष्ठांसाठी शहाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज यांची अभ्यासून नवी तैलचित्रे बनवण्यात आली आहेत.
सन १९३८ मध्ये मुंबईचे माजी गव्हर्नर लॉर्ड ब्रेबॉन यांच्या इच्छेवरून वा. सी. बेंद्रे यांना सरकारी ‘हिस्टॉरिकल रिसर्च स्कॉलर’ म्हणून इतिहास संशोधनासाठी युरोप व इंग्लंडला पाठवले गेले. दोन वर्षात संशोधनात त्यांनी मराठ्यांच्या विशेषतः छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहास विषयक साधनांचे संशोधन व त्या करिता इंडिया हाउस व ब्रिटीश म्युझियम मधील ऐतिहासिक साधनांचे सुमारे २५ खंड होतील एवढी सामुग्री भारतात परत आणली. या काळात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे मुळ चित्र शोधले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुरतेवरील स्वारीवेळी हे चित्र एका डच चित्रकाराने तत्कालीन गव्हर्नर व्हॅलेन्टाइन यांच्या सांगण्यावरून काढलेले होते. बेंद्रे यांनी हे चित्र शोधण्याअगोदर, इब्राहीम खान नावाच्या एका परकीय व्यक्तीचे चित्र ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र म्हणून महाराष्ट्राच्या इतिहास विषयक पुस्तकातून छापलेले होते. हे चित्र मनुची ह्या चित्रकाराच्या संबंधात होते. यावरून त्याच आकृतीचे चेहरे रंगवून मुसलमान पेहराव चढवलेली तथाकथित शिवाजी महाराजांची बरीच चित्रे प्रसारात आली होती. संदर्भहीन असे महाराजांचे चित्र समाजात पूजिले जात होते. इतिहासाचार्य वा. सी. बेंद्रे यांच्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांची मूळ चित्र सर्वांना उपलब्ध झाली आहेत.
चाळीस वर्षाच्या संशोधनानंतर सन १९६० साली छत्रपती संभाजी महाराजांचे खरे चरित्र वा. सी बेंद्रे यांनी सर्वांसमोर प्रसिद्ध केले होते. या ग्रंथाने समाजात महाराष्ट्र इतिहास संशोधन क्षेत्रात वा. सी. बेंद्रे यांचे नाव छत्रपती संभाजी महाराजांवरील त्यांचे प्रदीर्घ संशोधन व संभाजी महाराजांची पारंपारिक प्रतिमा बदलून नवी प्रतिमा उभे करणारे म्हणून प्रसिद्ध आहे. त्यातून संभाजी महाराजांची व्यक्तिरेखाच बदलली. त्यामुळे संभाजी महाराजांची पराक्रमी, संकटाला धीरोदात्तपणे तोंड देणारी, धोरणी, मुत्सद्दी अशी तेजस्वी प्रतिमा उंचावली गेली.
बेंद्रे यांनी सर्व विवेचन साधार आणि संशोधनाच्या पायावर उभे केले. या चरित्रामुळे स्वाभिमानी, धर्मनिष्ठ, पराक्रमी, संस्कृत जाणकार अशा छत्रपती संभाजीराजा बद्दलचे सर्व गैरसमज दूर झाले. त्या आधारे संभाजी महाराजांच्या जीवनातील सर्व विसंगती त्यांनी निपटून काढल्या. बेंद्रे यांनी यासाठी ऐतिहासिक कागदाचा चिंटोराही दुर्लक्षित केला नाही. या कार्यक्रमात छत्रपती संभाजी महाराजावरील ग्रंथ नव्या रूपात प्रकाशित केला जाणार आहे. युद्धसन्मुख राजा असा ज्या छत्रपती संभाजी राजांचा गुणगौरव केला गेला आहे त्यांचं तेंगणापट्टणम तामिळनाडू येथील युद्धातलं अतिशय भारदस्त चित्र या कार्यक्रमात प्रकाशित केलं जाणार आहे.
पत्रकार बैठकीस डॉ. दामोदर नाईक दुर्ग अभ्यासक भगवान चिले, शाहू युथ फौंडेशनचे प्रसाद वैद्य, इंद्रजीत माने, प्रशांत देसाई, सुशांत फराळे, शिवशक्ती प्रतिष्ठानचे साताप्पा कडव यांनी दिली.