कागलमध्ये शाहू ग्रुपमार्फत राजर्षि छ. शाहू महाराज कागल स्पर्धेचे आयोजन

कागल (प्रतिनिधी) : येथील श्री शाहू ग्रुपने श्री छ.शाहू स्मृती शताब्दी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन सुरु केले आहे. त्या अंतर्गत रविवार दि ५ जून रोजी शाहू ग्रुपमार्फत छ. शाहू महाराज मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केल्याची माहिती शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

  याबाबत माहिती देताना समरजितसिंह घाटगे म्हणाले, श्री छ.शाहू स्मृती शताब्दी वर्षानिमित्त शाहू कृषी प्रदर्शन, व इतिहास संशोधक डॉ. बी. डी. खणे यांचे व्याख्यान असे दोन उपक्रम पार पडले असून, खुली मारोथॉन स्पर्धा हा तिसरा उपक्रम आहे.  चार विविध गटांमध्ये या स्पर्धा होत असून   श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना प्रधान कार्यालय श्रीमंत जयसिंगराव घाटगे भवन येथील छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यापासून सकाळी सहा वाजता या स्पर्धेस प्रारंभ होणार आहे. स्पर्धेचा ट्रॅक कारखाना प्रधान कार्यालय ते व्हन्नूर फाटा वरून  परत असा राहणार आहे.

 खुल्या गटामध्ये पुरुषांसाठी दहा किलोमीटर तर महिलांसाठी साठी पाच किलोमीटर अंतर  राहणार आहे. याशिवाय मुलांसाठी सोळाशे मीटर व मुलींसाठी सोळाशे मीटर धावणे अशा स्वतंत्र गटात ही स्पर्धा होईल. पुरुषांसाठी दोनशे रुपये तर महिलांसाठी शंभर रुपये प्रवेश फी राहणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे.