औरंगजेबच्या कबरीपुढे गुडघे टेकणाऱ्यानो तुम्हालाही त्याच कबरीत गाडू : संजय राऊत

मुंबई : वारंवार औरंगजेबाच्या कबरीसमोर गुडघे टेकवत महाराष्ट्रात अशांतता पसरविण्याचा प्रयत्न ओवेसींकडून होतोय. औरंगजेबाने आमची मंदिरं उध्वस्त केली, औरंगजेबालाही महाराष्ट्राच्या याच मातीत गाडलं होतं, तुम्हालाही त्याच कबरीत जावं लागेल हे लक्षात ठेवा. ज्यांनी औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतलं, त्यांनाही याच मातीत गाडू, असा इशारा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन औवेसी यांना दिला.

एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन औवेसी हे औरंगाबादच्या दौऱ्यावर असून त्यांनी खुल्ताबाद येथील औरंगजेबच्या कबरीचं दर्शन घेतल्यानंतर संजय राऊत यांनी याप्रकरणी अकबरुद्दीन औवेसींवर टीका केली आहे.

राऊत म्हणाले, काश्मिरमधील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होतोय. सातत्याने काश्मिरी पंडितांच्या हत्या होत असून त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न महत्वाचा आहे. शिवसेना संवेदनशीलपणे या विषयाकडे पाहतोय, पण केंद्र सरकार काय करतेय? या प्रकरणी पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांनी गांभीर्याने दखल देण्याची आवश्यकता आहे या दोघांनी केंद्रीय राजकारण बाजूला ठेवून लक्ष दिलं पाहिजे.