मुंबई: शिवसेनेचे अंधेरी पूर्व या मतदारसंघाचे आमदार आणि शाहूवाडी तालुक्याचे सुपुत्र रमेश लटके (वय ५२) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुबई येथे निधन झाले आहे. दुबईत त्यांचे कुटुंबीय खरेदीसाठी बाहेर गेले असताना लटके यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती आहे.
रमेश लटके हे मूळचे शाहूवाडी तालुक्यातील कुंभवडे गावचे होते. मुंबई महापालिकेचे नगरसेवक असताना त्यांनी शाहूवाडी मतदारसंघ संघातून विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना यश आले नसले तरी त्यांनी माजी आमदार बाबासाहेब पाटील व माजी आमदार संजयसिंह गायकवाड यांच्या विरोधात निकराची लढत दिली होती. त्यांच्या निधनामुळे शाहूवाडी तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
लटके हे १९९७ साली मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचे नगरसेवक म्हणून निवडून गेले. त्यानंतरच्या सन २००२ आणि २००९ च्या महापालिका निवडणुकीत विजयी होत ते महापालिकेत नगरसेवक म्हणून गेले. तर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना बढती मिळाली आणि ते विधानसभेच आमदार म्हणून निवडून गेले. त्यानंतर पुढच्याच २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत अंधेरी पूर्वच्या मतदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना पुन्हा निवडून दिले.
भाजपचे सुनील यादव यांचा पराभव करून लटके हे २०१४ मध्ये अंधेरी पूर्वमधून महाराष्ट्र विधानसभेवर पहिल्यांदा निवडून आले. यावेळी काँग्रेसचे उमेदवार सुरेश शेट्टी हे तिसऱ्या स्थानावर होते. पुढे २०१९ मध्ये त्यांनी अपक्ष उमेदवार एम. पटेल यांचा पराभव केला. त्यावेळी लटके हे १६ हजार ९६५ मतांनी विजयी झाले होते. या निवडणुकीत काँग्रेसचे जगदीश अमीन हे तिसऱ्या स्थानी होते.