उत्तर प्रदेश सरकारचे मुंबईत कार्यालय : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

लखनौ : उत्तर प्रदेशातल्या मुंबईत स्थलांतरीत झालेल्या नागरिकांच्या सुरक्षा आणि उत्तर प्रदेशातल्या रोजगार व पर्यटन याची माहिती देण्यासाठी मुंबईत लवकरच एक मोठं कार्यालय उभं राहाणार असल्याची घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली. 

मुंबईत जवळपास ८० लाख उत्तर भारतीय वास्तव्याला आहेत. त्याची दखल आता योगी सरकारनं घेतली आहे. मुंबईत राहणाऱ्या उत्तर भारतीयांच्या सामाजिक सुरक्षा आणि मूळ राज्यात गुंतवणूक, रोजगार, पर्यटन आदींची माहिती या मुंबईत राहाणाऱ्या स्थलांतरीत नागरिकांना व्हावी या दृष्टीनं उत्तर प्रदेश सरकारने आता मुंबईत एक कार्यालय स्थापन करण्याची घोषणा केली आहे. उद्योग, सेवा, किरकोळ क्षेत्र, मनोरंजन क्षेत्र, दूध व्यवसाय, रिक्षा-टॅक्सी व्यवसाय आदी मुंबईच्या रोजच्या गोष्टींची गरज भागवण्यासाठी हे उत्तर भारतीय प्रत्येक क्षेत्रात कार्यरत असलेले पाहायला मिळतात.चित्रपट क्षेत्रातही हे उत्तर भारतीय मोठ्या प्रमाणावर काम करताना पाहायला मिळतात. स्थलांतरित नागरिकांना उत्तर प्रदेशातील पर्यटन, संस्कृती आणि इतर क्षेत्रातील गुंतवणुकीच्या शक्यतांची जाणीव करुन देणे आणि त्यांना तिथे उद्योग सुरु करण्यास प्रवृत्त करणे हा मुंबईत कार्यालय सुरु करण्यामागचा योगी सरकारचा उद्देश असल्याचं सांगितलं जात आहे.