गडहिंग्लज : गडहिंग्लज नगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवू, असा निर्धार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. या नगरपालिका निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेससह काँग्रेस, शिवसेना व मित्रपक्ष अशी मिळून महाविकास आघाडी म्हणून लढू, असेही ते म्हणाले.
येथील भीमनगरमध्ये विकासकामांच्या उद्घाटनासह बांधकाम कामगारांना सुरक्षा संचांचे वाटप कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
प्रा. किसनराव कुराडे म्हणाले, मंत्री हसन मुश्रीफ यांच्यामुळेच गडहिंग्लज शहर विकासाच्या वाटेवर आले आहे. भविष्यात महाविकास आघाडी म्हणून एकत्र काम करूया.
माजी नगराध्यक्ष किरण कदम म्हणाले, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी गेल्या पाच वर्षात गडहिंग्लज शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ३३ कोटी निधी दिला आहे.
गडहिंग्लज शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रा. सिद्धार्थ बन्ने म्हणाले, नगरपालिकेतील जनता दलाच्या सत्ताधाऱ्यांनी नागरिकांकडून केवळ करांच्या रूपाने आलेला पैसाच विकास कामावर खर्च केला आहे. नवीन कोणतीही योजना अगर काम आणले नाही.
नगरसेवक हारुण सय्यद म्हणाले, मंत्री मुश्रीफ यांनी खऱ्या अर्थाने गडहिंग्लजच्या विकासाला चालना व गती दिली.
नगरसेवक सौ. रेश्मा कांबळे म्हणाल्या, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यानी बांधकाम कामगारांच्या आयुष्याची कोटकल्याण करणा-या योजना राबविल्या आहेत.
व्यासपीठावर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश पाटील -गिजवणेकर, उदयराव जोशी, सौ. शर्मिली मालंडकर, सौ. शारदा आजरी, उदय परीट, संतोष कांबळे, राजशेखर दड्डी, सुरेशआण्णा कोळकी, गुंडेराव पाटील, आदी प्रमुख उपस्थित होते.
“चटका पायाला आणि काळजालाही………”
नगरसेवक महेश सलवादे म्हणाले, मंत्री मुश्रीफ यांनी गाडीतून उतरताच विचारले हा एक रस्ता का झाला नाही? त्यावर त्यांना तो आत्ता नियोजनात धरला असल्याचे सांगितले. खराब रस्त्यामुळे जनतेच्या पायाला बसणारे चटके हे मंत्री मुश्रीफ यांच्या काळजाला बसणारे चटके आहेत, एवढी त्यांची जनतेशी एकरूपता झाली आहे, असेही सलवादे म्हणाले.