कोल्हापूर : कोल्हापूरहून सकाळी १०:३५ ला सुटणारी व मिरजेहून गांधीनगरमध्ये सांयकाळी सहा व सात वाजता येणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या उचगाव येथे थांबवण्याची मागणी करवीर तालुका शिवसेनेच्यावतीने कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराज टर्मिनसचे स्टेशन अधीक्षक सुरेश तारासिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, गांधीनगर ही पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी कापड व्यापारपेठ असून गांधीनगर येथे कामासाठी जाणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. उचगावहूनही गांधीनगरला कामासाठी जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. विशेष करून महिला वर्ग गांधीनगर येथे कामासाठी मोठ्या प्रमाणात जातो. या महिलांना मासिक पास आर्थिकदृष्ट्या परवडतो. सध्या उचगाव येथे रेल्वे थांबत नसल्याने वडापला जादा पैसे देऊन जावे लागते. त्यामुळे या महिलांची परवड होत आहे. पूर्वी सकाळी १०:३५ वाजता कोल्हापूरहून येणारी रेल्वे गाडी उचगाव येथे थांबत होती. त्यावेळी उचगावहून जाणारी सर्व महिला व पुरुष ह्या गाडीतून कामासाठी उचगावहून गांधीनगरला जात होते व सायंकाळी गांधीनगरला ६:०० वाजता येणारी गाडीही उचगाव येथे थांबत होती. त्यावेळी कामावरून मोठ्या प्रमाणात घरी येणाऱ्या महिला व पुरुषही त्या रेल्वेने येत होते. ही सर्व मंडळी मासिक पास काढून रेल्वेने प्रवास करतात पण सध्या ही जाणारी व येणारी रेल्वे उचगाव येथे थांबत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. तरी पूर्वीसारखी उचगाव येथे रेल्वे थांबा व्हावा, रेल्वेचा प्रवास हा सामान्य लोकांना परवडणारा असल्याने सर्व सामान्य प्रवाशांची सोय होत असते तरी उचगाव येथे पूर्वीसारख्या रेल्वेगाड्या थांबवाव्यात या मागणीचे निवेदन करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने छत्रपती शाहू महाराज टर्मिनस,कोल्हापूरचे स्टेशन अधीक्षक सुरेश तारासिंह यांना देण्यात आले. रेल्वे गाड्या थांबवण्यासाठी वरिष्ठांशी चर्चा करून पुढील कार्यवाही करू असे आश्वासन करवीर शिवसेनेच्या शिष्टमंडळाला तारासिंह यांनी दिले.
यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, शाखाप्रमुख अजित चव्हाण, रविना अतिग्रे, वैशाली घाटगे, दिपीका सोनोलीकर, सुवर्णा कांबळे, स्मिता मेरुडे, सरिता अडगळे आदी उपस्थित होते.