कोल्हापूर : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी निमित्ताने कोल्हापूर जिल्ह्यातील बारा तालुके आणि कोल्हापूर शहरातून पाच अशा एकूण १७ शाहू ज्योत शाहू समाधीस्थळी आणण्यात आल्या. प्रारंभी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री सतेज पाटील यांनी शाहू ज्योतीचे स्वागत केले. आमदार पी. एन. पाटील, जयंत आसगावकर जिल्हाधिकारी राहुल रेखावर उपस्थित होते.
जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून मोठ्या उत्साहाने शाहू प्रेमी कार्यकर्ते शाहू ज्योती घेऊन आले होते. शाहूवाडी येथून ४५ किलोमीटरचे अंतर धावत ही शाहू ज्योत समाधी स्थळी आणण्यात आली. कोल्हापूर शहरातील पाण्याचा खजिना येथून आणलेली शाहू ज्योत मिरजकर तिकटी, केशवराव भोसले नाट्यगृह, बिंदू चौक, शिवाजी पुतळा मार्गे समाधीस्थळी आली. शाहू जन्म स्थळावरून कसबा बावडा येथील शाहू प्रेमींनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, महावीर कॉलेज, खानविलकर पंप यामार्गे तर नवीन राजवाडा या ठिकाणाहून महावीर कॉलेज मार्गे ही ज्योत समाधीस्थळी पोहोचली. रेल्वे स्टेशन वरुन दसरा चौक मार्गे कसबा बावडा फुटबॉल क्लबचे खेळाडू आणि कोल्हापूर आर्ट फाउंडेशनचे कलाकार ज्योत घेऊन आले. शाहू मिल येथून बिंदु चौक, लक्ष्मीपुरी दसरा चौक मार्गे संयुक्त राजारामपुरीचे कार्यकर्ते ज्योत घेऊन आले. सोनतळी येथून वडणगे फुटबॉल क्लबचे खेळाडू आणि शाहू प्रेमींनी समाधीस्थळी मशाल आणली.
