यड्राव : वॅगनआर कार, मोटरसायकल व जनरेटर घेऊन जाणारी ट्रॉली यांच्यात झालेल्या अपघातात खोतवाडीचा युवक जागीच ठार, तर एक जण जखमी झाला आहे. दर्शन दगडू खोत (वय २०, रा. खोतवाडी) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. तर आशिष ओमप्रकाश पाल (वय २०, रा. खोतवाडी) असे जखमी युवकाचे नाव आहे. ही घटना आज सकाळी नऊच्या सुमारास यड्राव फाटा येथे घडली.
याबाबत अधिक माहिती अशी, दर्शन व आशिष हे मोटरसायकलवरून इचलकरंजीकडे निघाले होते. यड्राव फाट्याजवळील पेट्रोल पंपासमोर वॅगनआर कार, जनरेटर घेऊन जाणारी ट्रॉली व मोटरसायकल यांच्यात हा अपघात झाला. यावेळी जनरेटर घेऊन जाणारी ट्रॉली दर्शनच्या पोटावरून गेली. तर आशिष जखमी झाला. अपघातानंतर नागरिकांनी दर्शनला इचलकरंजीतील आयजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याची प्रकृती अधिकच गंभीर झाल्याने, त्याला येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.