जोतिबाच्या चैत्र यात्रेची तयारी पूर्ण; भाविक दाखल

जोतिबा : दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या उद्या, शनिवारी होणाऱ्या चैत्र यात्रेची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. मुख्य यात्रा जरी शनिवारी असली तरी दोन दिवसापासून दूरवरचे भाविक डोंगरावर दाखल झाले आहेत.

या यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि गोवा राज्यातून १० लाखांहून अधिक भाविक यात्रेच्या दरम्यान दाखल होत असतात. यात्रेपूर्वी मानाच्या सासन काठ्या दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. दोन दिवसापासून हलगी-ताशांचा कडकडाटात बिगरमानाच्या सासनकाठ्यांसह भाविक येऊ लागले आहेत. त्यामुळे डोंगरावर गर्दी होऊ लागली आहे. पारंपरिक वाद्याच्या गजर आणि गुलालाची उधळण करत हळूहळू गर्दी जमू लागली आहे.

   राज्य परिवहन महामंडळाने भाविकांच्या सोयीसाठी कोल्हापूर ते जोतिबापर्यंत जादा एसटी बसेसची सोय केली आहे. तर कोल्हापूर महापालिकेकडून जादा केएमटी बसेस सोडल्या जाणार आहेत. काही भाविक स्वतः गाड्या करून आले होते. काही हौशी भाविक अजूनही बैलगाड्या सजवून यात्रेला आल्याचे चित्र दिसते.