मुंबई : ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी तेढ निर्माण करणारं वक्तव्य केल्याप्रकरणी दोन वर्षांपूर्वी त्यांच्याविरोधात सातारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याप्रकरणी सातारा पोलिसांनी गुणरत्न सदावर्ते यांना ताब्यात घेतलं आहे.
शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केल्यानंतर सदावर्ते यांना मुंबई पोलिसांनी अटक केली होती. काल त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली. पण आता त्यांचा ताबा सातारा पोलिसांना देण्यात आला आहे.
शरद पवारांच्या घरावर हल्लाप्रकरणी ताब्यात असलेल्या सदावर्ते यांच्यावर दुसरीकडे साताऱ्यातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन वर्षांपूर्वी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी एका खाजगी न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी छत्रपती उदयनराजे भोसले आणि कोल्हापूरचे संभाजीराजे यांच्याविरोधात आक्षेपार्य वक्तव्य केले होते. सातारा शहर पोलीस ठाण्यात राजेंद्र निकम यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑक्टोबर २०२० मध्ये चौकशीसाठी सदावर्ते यांना बोलावले होते. मात्र ते गैरहजर राहिल्याने सातारा शहर पोलिसांनी या प्रकरणात ताबा मिळण्यासाठी गिरगाव न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयाने सदावर्ते यांचा ताबा सातारा पोलिसांकडे दिल्यानंतर आज सदावर्तेंना सातारा पोलिसांनी ताब्यात घेत साताऱ्याकडे रवाना झाले आहेत.