‘भोंग्या’वरून राजकारण तापले; महाविकास आघाडीचे नेते ‘कोपले’!

मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील शिवाजी पार्कमधील मेळावा आणि त्यानंतर काल ठाण्यातील उत्तर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार संजय राऊत, सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर जहरी टीका केली. राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंगे उतरविण्यासाठी महाविकास आघाडी सरकारला अल्टीमेटम दिला आहे. त्यावर आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज ठाकरेंना टार्गेट केले आहे.

तुमची अक्कल ईडी कार्यालयात गहाण पडलीय : संजय राऊत

संजय राऊत म्हणाले, राज ठाकरे हे भाजपचा भोंगा आहेत. त्यांना भाजपने ईडी कारवाईची धमकी दिली होती. त्यामधून अभय मिळाल्यानंतर हे भोंगा प्रकरण सुरू झालं आहे.  अल्टीमेटम देण्याची ताकद फक्त बाळासाहेब ठाकरेंमध्ये होती. दुसऱ्या पक्षाने तुमच्या तोंडाला भोंगा लावला आहे. ईडीच्या कारवाईतून मुभा दिल्यानं तुमचा भोंगा वाजतोय. तुमची अक्कल गेल्या दीड वर्षांपासून ईडी कार्यालयात गहाण पडलीय.

पुरंदरेवर टीका करणाऱ्यांचा मला अभिमान : शरद पवार

शरद पवार यांनी आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले. शिवरायांचे नाव घेत नाही, हा आरोप खोटा आहे. राज ठाकरे सहा महिन्यांमधून एखादे विधान करतात. त्यामुळे त्यांचे विधान गांभीर्याने घेण्याची गरज नाही. शिवरायांना घडविण्यात राजमाता जिजाऊंचे योगदान मोठे होते. बाबासाहेब पुरंदरे यांच्याबाबत मी याआधी बोललो होतो. पुरंदरेंच्या माहितीच्या आधारे जेम्स लेनकडून चुकीचे लिखाण केले आहे, असा आरोप पवार यांनी करून पुरंदरेवर टीका करणाऱ्यांचा मला अभिमान आहे, असेही ते म्हणाले.

वारंवार रंगरूप बदलणारे व्हायरस वाढत आहेत : जयंत पाटील

२०१४ ला मोदींना पाठींबा, २०१९ ला मोदींना विरोध आता पुन्हा मोदींची पालखी खांद्यावर, वारसा प्रबोधनकार ठाकरेंचा मात्र विचारसरणी नथुराम गोडसेची, पुतण्या बाळासाहेब ठाकरेंचा, मात्र नातं बाळासाहेबांचा विचार संपवणाऱ्या लोकांशी. वारंवार रंगरूप बदलणारे व्हायरस महाराष्ट्रात वाढत आहेत, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली.

बाळासाहेबांना दुखावणाऱ्यावर काय बोलावे : सुप्रिया सुळे

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात तरुणांच्या खऱ्या प्रश्नावर कधीच चर्चा केल्याचे मी ऐकलेले नाही देशासमोर आणि राज्यासमोर महागाई आणि रोजगाराच्या अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत, पण राज ठाकरे इतिहासात रमले आहेत. ज्या व्यक्तीने हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना दुखावले त्या व्यक्तीविषयी मी काय बोलणार, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

जशाच तसे उत्तर दिले जाणार : जितेंद्र आव्हाड

राज ठाकरे यांना जशाच तसे उत्तर दिले जाणार असून उत्तर पूजेनंतर विसर्जन होते, असा टोला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी लगावला. जितेंद्र आव्हाड यांनी सभेच्या जवळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जाऊन अभिवादन का केले नाही, छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्यावर एकमेव वार करणाऱ्याचे मुंडके छाटण्यात आले, त्या कृष्णाजी भास्कर यांचे आडनाव कुलकर्णी हे होते, ते का सांगितले जात नाही, हा इतिहास राज यांना माहित नाही का? असे प्रश्नदेखील त्यांनी उपस्थित केला आहेत.

🤙 9921334545