‘जय’श्री की सत्य‘जित’; शनिवारी मिळणार ‘उत्तर’

कोल्हापूर : उत्तर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. मतदान झाल्यानंतर आता आकडेमोडीला सुरुवात झाली असून निकाल काय लागणार याची कमालीची उत्सुकता लागून राहिली असून ‘जय’श्री की सत्य‘जित’ याचे ‘उत्तर’ शनिवारी मिळणार आहे.

महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव आणि भाजपचे सत्यजित कदम यांच्यात काटा लढत झाली असली तरी पालकमंत्री सतेज पाटील व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या दोघांनीही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने जोरदार चुरस निर्माण झाली होती. मतदानानंतर पत्रकार बैठका घेवून आजी- माजी पालकमंत्र्यांनी विजयाचा दावा केला आहे. वाढत्या उन्हाबरोबर प्रचाराच्या तोफाही धडाडल्या. महाविकास आघाडीने काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेनेसह मित्र पक्षांची मोट बांधून प्रचाराचा धडाका लावला. तर उत्तर विधानसभा मतदारसंघाची जागा खेचून आणण्याचा चंग बांधत कोल्हापुरात कमळ फुलवण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली.

काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व मित्रपक्षांच्या राज्यस्तरावरील मोठ्या नेत्यांची फौज प्रचारात सक्रिय होती. महाविकास आघाडीकडून पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मुख्यमंत्री व विद्यमान बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार अमोल कोल्हे, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, राजेश क्षीरसागर, खासदार विनायक राऊत, मंत्री बच्चू कडू, विश्वजीत कदम, आमदार प्रणिती शिंदे, आमदार रोहित पवार, आमदार धीरज देशमुख, आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख नेते प्रचाराचा किल्ला लढवला.

तर भाजपकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील माजी खासदार धनंजय महाडिक, जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, स्वतः उमेदवार सत्यजित कदम, देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव, भागिरथी संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक, गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक आदींनी प्रचाराचे सुक्ष्म नियोजन केले. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार उदयनराजे भोसले, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपा प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ, प्रवक्ते केशव उपाध्ये, माधव भंडारी, माजी मंत्री पंकजा मुंडे, आमदार विनय कोरे, आशिष शेलार, प्रकाश आवाडे, सदाभाऊ खोत, हर्षवर्धन पाटील, राज पुरोहित आदींच्या तोफा धडाडल्या.

निवडणुकीच्या मतदानानंतर आता निकालाबाबत राजकीय कार्यकर्त्यांप्रमाणेच मतदारांनाही उत्कंठा लागून राहिली आहे. मतमोजणीसाठी तीन दिवसांचा अवधी असल्याने उमेदवार गॅसवर राहणार आहेत. परंतु त्यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी झालेल्या मतदानाचा कानोसा घेऊन आकडेमोड सुरू केली असून निकालाबाबत ठोकताळे बांधण्यासही सुरवात झाली आहे. या आधारेच आता लिडची चर्चा सुरु झाली आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ६१.५२ टक्के मतदान झाले होते. तर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ५९ टक्के मतदान झाले होते. यावेळी ६१.१९ टक्के मतदान झाले आहे. उन्हाच्या तडाखा आणि पोटनिवडणूक असूनही या मतदारसंघात चांगले मतदान झाले. निवडणुकीत विविध समीकरणांमुळे बऱ्याच वेळा ही निवडणूक वर-खाली झाली.