झेड सिक्युरिटी असलेले सोमय्या कुठे आहेत : दिलीप वळसे-पाटील

मुंबई : ‘विक्रांत वाचवा’च्या नावाखाली सोमय्या पितापुत्रांनी कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याचा भांडाफोड खासदार संजय राऊत यांनी केला होता. न्यायालयाने किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. सोमय्या सध्या अंडरग्राउंड असून याबाबत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले, दुसऱ्यावर आरोप करणे सोपे असते, परंतु स्वत:वर आरोप झाले की त्याला सामोरे जायचे नाही हे शूरपणाचे लक्षण नाही. झेड सिक्युरिटी असलेले सोमय्या कुठे आहेत याबाबत केंद्र सरकारला प्रश्न विचारणार आहे.

दिलीप वळसे-पाटील म्हणाले, नेत्यांचे फोन टॅप करण्याचा उद्देश नक्की काय होता हे अद्याप समोर आलेले नाही. या प्रकरणी जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.

शरद पवार यांच्या बंगल्यावर जाणूनबुजून आणि विचारपूर्वक हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी चौकशी सुरू असून जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असे वळसे-पाटील म्हणाले. चार तारखेला इंटेलिजन्स विभागाने पत्र लिहून कळवल्याची गोष्ट खरी असून तरीही सुरक्षेमध्ये कमतरता राहिली. पुरेसा बंदोबस्त ठेवण्यात आला नाही. त्याची चौकशी सुरू असून संबंधित डीसीपींची बदली केली आहे, तसेच गावदेवीच्या इन्स्फेक्टरला निलंबित केले आहे.