मानसिंग बोंद्रेला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

कोल्हापूर : अंबाई टँक बेछूट गोळीबार करून त्याचा व्हिडीओ व्हायरल केल्याच्याप्रकरणातील मुख्य संशयित मानसिंग विजय बोंद्रे (वय ३०, रा. अंबाई टँक, कोल्हापूर) याला मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी जामीन मंजूर केला.

मानसिंग बोंद्रेने १२ डिसेंबर, २०२१ रोजी रात्री गोळीबार केला होता. सावत्र भाऊ अभिषेक चंद्रकांत उर्फ सुभाष बोंद्रे (वय ३०, रा. अंबाई टँक, कोल्हापूर) यांनी याप्रकरणी मानसिंग बोंद्रेविरुद्ध जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. जुना राजवाडा पोलिसांनी मानसिंग बोंद्रे याच्यासह चौघांविरुद गुन्हा दाखल केला होता.

मुख्य संशयित मानसिंग बोंद्रेला पोलिसांनी आंबा घाटात अटक केले होती. मानसिंग बोंद्रे याने जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळून लावला होता. त्यानंतर त्याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मुंबई उच्च न्यायालयाने जामीन अर्ज मंजूर केला आहे.