पाच लाखाची लाच घेतली, पोलिस कोठडीत रवानगी झाली; गारगोटीत ग्रामविकास अधिकारी जाळ्यात

गारगोटी : गारगोटी येथील सयाजी कॉम्प्लेक्स गाळ्यांच्या व बंगल्याची वेगवेगळ्या नोंदी करण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच घेताना ग्राम विकास अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. आज, सोमवारी दुपारी सापळा लावून त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. अमृत गणपती देसाई (सध्या रा. गडहिंग्लज, मुळगाव पेरणोली, ता. आजरा) असे लाचखोर ग्राम विकास अधिकाऱ्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, गारगोटी- कोल्हापूर मार्गावरीलवरील गोंजारी हॉस्पिटलसमोरील सयाजी कॉम्प्लेक्स गाळ्यांच्या वेगवेगळ्या नोंदणीसाठी चालढकल सुरू होती. ग्राम विकास अधिकारी अमृत देसाई याने तक्रारदाराने नोंदणीकरिता २० लाख रुपये किंवा दुकान गाळा देण्याची मागणी केली होती. तडजोडी अंती हा व्यवहार १४ लाखाला ठरला. तक्रारदाराने याबाबतची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली होती. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज सापळा लावला होता. आज दुपारी सयाजी कॉम्प्लेक्स मधील कार्यायलात ग्राम विकास अधिकारी अमृत देसाई यास पाच लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई पोलिस निरीक्षक नितीन कुंभार, शरद पोरे, विकास माने, सुनील घोसाळकर, रुपेश माने यांनी केली.

🤙 9921334545