बहिरेश्वरच्या कोटेश्वर मंदिरात रामनवमी उत्साहात

बहिरेश्वर (प्रतिनिधी) : बहिरेश्वर येथील कोटेश्वर मंदिरात वारकरी सांप्रदायिक व ग्रामस्थांनी रामनवमी निमित्त दुपारी ठीक १२ वाजता श्री राम जन्मकाळ साजरा केला. पाळणा व भक्ती गीते गात, हार-फुले अर्पण करत भक्तीभावाने रामनवमी साजरी केली.

या निमित्त कोटेश्वर मंदिरात भजन, कीर्तन, प्रवचन असे आध्यात्मिक कार्यक्रम आयोजित केले होते. त्यामुळे सकाळपासूनच भाविकांनी विशेषतः महिलांनी मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती. यावेळी वारकरी सांप्रदायिक ईश्वरा साठे यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव सुनील साठे यांंनी रामनवमीचे औचित्य साधून भजनी मंडळास पखवाज हे वाद्य भेट स्वरुपात दिले. त्यांचाही यावेळी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.


रामनवमी निमित्त ग्रामस्थ व भजनी मंडळ यांच्या वतीने गावात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
आज सकाळीच ह.भ.प कै आनंदा तुकाराम बचाटे यांचे निधन झाल्याने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.