कोल्हापूर : विकासाच्या योजना यशस्वी केल्या, देशाला दिशा मिळाली, कणखर नेतृत्व मिळाले म्हणूनच संपूर्ण देशात भाजपचा विजयाचा रथ धावत आहे. स्वातंत्र्यानंतरच्या ७० वर्षात जे झाले नव्हते, ते पंतप्रधान मोदी यांनी करून दाखवून जनतेचा विश्वास मिळवला आहे. भाजपच्या विकासाची ध्येयधोरणे, समाजातील तळागाळापर्यंत पोचवा, विजय आपलाच आहे, अशा शब्दात भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी कार्यकर्त्यांना रिचार्ज केले.
भाजपच्या शक्ती केंद्र प्रमुखांच्या मेळाव्यात ते बोलत होते. कोल्हापूर उत्तरच्या निवडणुकीत पालकमंत्र्यांची दादागिरी आणि दहशत सुरू आहे. अनेक संस्था-संघटनांवर दबाव टाकून कॉंग्रेसला पाठिंबा दिल्याची पत्रके देण्यास ते भाग पाडत आहेत. मात्र सत्ता नेहमी बदलत असते. त्यामुळे कुणीच सत्तेचा गैरवापर करू नये, अन्यथा जनताच त्यांना चोख उत्तर देईल, असेही हाळवणकर यांनी नमुद केले. कॉंग्रेस म्हणजे बुडते जहाज आहे. संपूर्ण देशातून भाजपला वाढता जनाधार आहे. कारण भाजपच विकासाची दृष्टी असलेला पक्ष आहे, असे हाळवणकर म्हणाले. कोल्हापूर उत्तरच्या निवडणुकीत भाजपच्या कार्यकर्त्यांनी गाफील राहू नये. केंद्रातील मोदी सरकारच्या योजना समाजातील प्रत्येक स्तरापर्यंत पोचाव्यात, यासाठी प्रयत्न करा, यश आपलेच आहे, असे हाळवणकर म्हणाले. बांधकाम व्यावसायिक, विविध समाज संघटना, तालीम-मंडळे, उद्योजकांच्या संघटना, व्यापारी संघटना यांना त्यांचे राजकीय मत मांडण्याचा अधिकार आणि स्वातंत्र्य असले पाहीजे. पण पालकमंत्री हम करेसो कायदा या भावनेतून, दडपशाही करत आहेत. वास्तविक भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील आणि भाजप सरकारने या संस्थांना वेळोवेळी सहकार्य दिले आहे. त्यामुळे निवडणुकीच्या काळात विरोधकांनी कितीही हुकूमशाही केली, तरी समाजातील विचारी वर्गाचा भाजपलाच पाठिंबा असेल, असेही ते म्हणाले.
यावेळी अतुल वझे, मकरंद देशपांडे, रवी अनासपुरे, समरजितसिंह घाटगे, राहुल चिकोडे, महेश जाधव, विजय जाधव, अशोक देसाई, महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमाताई खापरे, गायत्री राऊत, नाथाजी पाटील, विठ्ठल पाटील यांच्यासह भाजप पदाधिकारी उपस्थित होते.