कोल्हापूर : गेल्या दहा वर्षात ज्यांच्या हातात महापालिकेची सत्ता आहे आणि स्वतः ला पालक समजतात तेच कोल्हापूरचे मालक झाले आहेत, टोला भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांना लगावला.

भाजपचे कोल्हापूर उत्तर मतदार संघाचे उमेदवार सत्यजित कदम यांच्या प्रचारार्थ बुधवार पेठ येथे आयोजित सभेत त्या बोलत होत्या. यावेळी भाजपच्या नेत्या चित्राताई वाघ, भाग्यश्री इंगवले, पवित्रा देसाई, संदीप देसाई यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
महाडिक म्हणाल्या, केंद्र शासनाकडून देशभरात विविध योजना राबवल्या गेल्या आहेत. यातील अनेक योजना महिलांच्या प्रगतीसाठी आहेत. मात्र, कोल्हापुरात जाणीवपूर्वक या योजना पोहोचू दिलेल्या नाहीत. कोल्हापूर जिल्ह्यात दहशत आणि दबावाचे राजकारण सुरू आहे असे राजकारण आम्ही कधीही बघितले नव्हते. आपण स्वतंत्र भारतात जगतो की नाही असा प्रश्न पडण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. महिलांनी या निवडणुकीत ताकद दाखवावी न घाबरता मतदान करून सत्यजित कदम यांच्या विजयाची गुढी उभारावी. आपला आवाज म्हणून सत्यजित कदम यांना निवडून आणायचे आहे. कोल्हापूर उत्तर मध्ये बदल घडला तर सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करता येणार आहे. त्यामुळे सत्यजित कदम यांना विधानसभेत पाठवावे.