गोंदियातील बालिकेनेही अनुभववली कोल्हापूरकरांची माणुसकी !

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जगात भारी आम्ही कोल्हापुरी ही कोल्हापूरची आता ओळख बनली आहे. कोल्हापूरकरांच्यातील माणुसकीचे वेळोवेळी दर्शन होत असते. असाच कोल्हापूरकरांच्या माणुसकीचा अनुभव गोंदियातील एका बालिकेला आला आहे.

कोल्हापुरात सांगली मिशन सोसायटीअंतर्गत चाईल्डलाईन ही संस्था बालकांच्या हक्कासाठी काम करते. ही संस्था बालकांसाठी २४ तास कार्यरत आहे. दि. २१ फेब्रुवारी २०२२ रोजी कोल्हापूर रेल्वे स्टेशनवर गोंदियावरून एक १३ ते १४  वर्षाची बालिका आली होती. तिच्यासोबत तिचे कोणीही पालक नव्हते. कावऱ्या- बावऱ्या नजरेने ही बालिका रेल्वे स्टेशनचा परिसर न्याहळत होती. विना पालक असलेली आणि घाबरलेली बालिका रेल्वे चाईल्डलाईनच्या कर्मचारी योगिता बागे व राजश्री दलवाई यांना दिसली.

रेल्वे पोलिसांनी या बालिकेची चौकशी करून तिच्या संरक्षणाची गरज ओळखून चाईल्डलाईनच्या सहकार्याने बालकल्याण समितीमध्ये तात्पुरत्या निवाऱ्यासाठी तिला ठेवण्यात आले. बालकल्याण समितीमधील सदस्य, कर्मचारी, रेल्वे चाईल्डलाईनची टीमने तिला चांगल्या आपुलकीची आणि प्रेमाची वागणूक देत माणुसकीचा हात देत “जगात भारी आम्ही कोल्हापुरी”ही म्हण सार्थ केली.

  या बालिकेला एक महिनाभर सौ. नलिनी शा. कृ. पंत वालावलकर कन्या निरीक्षण गृहात तात्पुरत्या निवाऱ्यासाठी ठेवण्यात आले. या ठिकाणी तिची घरच्याप्रमाणे काळजी आणि देखभाल घेतली गेली.

 काही दिवसांपूर्वीच तिचे पालक तिला नेण्यास गोंदियावरून कोल्हापूरला आले होते. तेंव्हा तिने जाताना या सर्वांच्याबाबत कृतज्ञता व्यक्त करून पत्र लिहिले आहे. मी माझ्या गावावरून एवढ्या लांब कोल्हापूरला आले. येथे येऊन या संस्थेत राहून मला समजावून घेणाऱ्या गोड ताई भेटल्या. मला . येथे खूप छान वाटले, मला येथे सर्व माझेच असल्यासारखे वाटले. मी तुम्हाला कधी विसरणार नाही. थॅंक्यु म्हणत तिने कोल्हापूरकरांकडून मिळालेल्या माणुसकीबद्दल आभार व्यक्त केले आहे.

🤙 9921334545