कोल्हापूर : घोटाळे, भ्रष्टाचार आणि तीन पक्षातील हेवेदावे, याला कंटाळलेली जनता, कोल्हापूर उत्तरच्या निवडणुकीत भाजपलाच निवडून देणार, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील केले.
न्यू शाहूपुरीतील वसंत सहवास अपार्टमेंटमधील नागरिकांशी संवाद साधताना चंद्रकांतदादा पाटील यांनी भाजपाची विकासाची धोरणे आणि कामे स्पष्ट केली.
चंद्रकांतदादा म्हणाले, भाजपची विकासाची दृष्टी, भ्रष्टाचारमुक्त कारभार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कणखर नेतृत्व यावर मतदारांचा पूर्ण विश्वास आहे. २०१४ ते २०१९ या पाच वर्षात मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात प्रत्येक घटकाला न्याय मिळाला. २०१९ च्या निवडणुकीत राज्यात भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्या. पण जनतेचा विश्वासघात करून, अभद्र महाविकास आघाडी सत्तेवर आली. त्यानंतर राज्यात घोटाळे, भ्रष्टाचार आणि तीन पक्षातील हेवे-दावे हेच चित्र पहायला मिळाले. राज्यात शिवसेनेचे मुख्यमंत्री असले तरी, राष्ट्रवादीचा सरकारवर रिमोट आहे. तर दोन्ही कॉंग्रेसकडून शिवसेना संपवण्याचे काम सुरू आहे. अशावेळी भाजपच सुशासन आणि विकासाला गती देवू शकतो, याची खात्री जनतेला पटली आहे. त्यामुळे कोल्हापूर उत्तर मतदार संघात भाजपला मोठा प्रतिसाद मिळतोय.
आमदार पाटील पुढे म्हणाले, ही निवडणूक म्हणजे भाजप विरूध्द तीन पक्ष अशी झाली आहे. शिवसेनेने सत्तेसाठी हिंदूत्वाची साथ सोडली. मंत्र्यांना तुरूंगात जाण्याची वेळ येत आहे. त्यावरून महाविकास आघाडी सरकारची संपूर्ण देशात नाचक्की झाली आहे. पण केवळ स्वार्थासाठी तिन्ही पक्ष आपापसात भांडत असले तरी सत्तेला चिकटून आहेत. विश्वासघाताने सत्तेवर आलेल्या सरकारने लोकांचा भ्रमनिरास केला आहे. त्यामुळेच गेल्या वर्षभरातील राज्यातील पोटनिवडणुकीत भाजपला यश मिळाले आहे, कोल्हापूर उत्तरमध्येही भाजपचा विजय निश्चित आहे. गेल्या ६० वर्षात कॉंग्रेसनी एका महिलेला आमदारकी का दिली नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
भाजपचे प्रदेश प्रवक्ते आणि माजी खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर उत्तरच्या प्रश्नांची मांडणी केली. खोटे बोलायचे, लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा ही विरोधकांची पध्दत असून, थेट पाईपलाईन, कोरोना काळातील सावळा गोंधळ, भ्रष्टाचार यातून कॉंग्रेसच्या पालकमंत्र्यांचा भेसुर चेहरा जनतेसमोर आल्याची टीका महाडिक यांनी केली.
तर सत्यजितनाना कदम यांनी महापालिकेतील नगरसेवक पदाचा अनुभव असून, आता कोल्हापूर उत्तरच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी पुर्ण क्षमतेने काम करून दाखवू, अशी ग्वाही दिली.
यावेळी महेश जाधव, निता घोलकर, कपिल जाधव, बाजीराव मुळीक, किरण पाटील, प्रा. गिरी गोसावी यांच्यासह वसंत सहवास सेासायटीमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
