नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर येथे ‘आदिवासी आरोग्य विषयक पहिला आंतरराष्ट्रीय परिसंवाद समारोप कार्यक्रम पार पडला. या निमित्ताने उभारलेल्या ‘आदिवासी व्हिलेज’ला मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी भेट दिली आणि आदिवासी समाजाची समृद्ध कला, पारंपरिक अन्नसंस्कृती तसेच वनौषधींची माहिती जाणून घेतली.
आदिवासी समाजाच्या आरोग्याबद्दल जागतिक मंथनासाठी नागपूर शहराची निवड केल्याबद्दल मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी संयोजकांचे आभार मानले. त्यांनी सांगितले की, हजारो वर्षांपासून आदिवासी समाजाची जीवनशैली निसर्गपूरक असून, त्यांच्या आरोग्यविषयक समस्या गंभीर आहेत. सध्याच्या घडीला 65% आदिवासी समाजाच्या महिलांना चांगल्या आरोग्यसेवेची व औषधोपचाराची आवश्यकता आहे. कुपोषणाचा प्रश्न अद्यापही मोठ्या प्रमाणात आहे आणि शासन त्यावर शर्थीने प्रयत्न करत आहे. महिला व लहान मुलांना सकस आहार मिळाल्यास मोठे परिवर्तन घडू शकते. “आदिवासी समाजाचे आरोग्य सुधारण्यासाठी कार्य करणाऱ्या संस्थांबरोबर हात मिळवून काम करण्याची गरज आहे,” असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले की, आदिवासी भागांमध्ये सिकल सेल आजार आणि मलेरियाचे वाढते प्रमाण चिंताजनक असून, त्वरित उपाययोजनांची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सिकल सेल मुक्त भारत’ संकल्पनेला अनुसरून एम्सने सिकल सेल संशोधनासाठी ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ची स्थापना करून महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. तसेच, महाराष्ट्र शासन गेट्स फाऊंडेशनच्या सहकार्याने गडचिरोलीमध्ये मलेरिया निर्मूलनासाठी ₹25 कोटींचा विशेष उपक्रम राबवत आहे.
आदिवासी समाजाच्या आरोग्यासाठी व्यापक आणि परिणामकारक धोरण आवश्यक आहे. शासन या संदर्भात गांभीर्याने विचार करत असून, यासाठी विशेष समिती स्थापन केली जाईल. ही समिती संपूर्ण आरोग्य धोरण तयार करून त्याची अंमलबजावणी सुनिश्चित करेल. एम्स, विद्यापीठे आणि आरोग्य विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नातून हे धोरण आकारास येईल, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी म्हटले.
यावेळी ’एम्स’ नागपूरचे संचालक डॉ. प्रशांत जोशी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.