कोपार्डे : कुंभी कासारी कारखान्याने सहवीज प्रकल्प, डिस्टिलरी असे प्रकल्प उभारुन तोटा कमी करत या प्रकल्पासाठी घेतलेली कर्जे कमी करून २०० ते २५० कोटी भांडवली गुंतवणूक निर्माण केली आहे. विरोधक वार्षिक सभेत कर्जे झाली म्हणून आणि सत्ताधारी एफआरपी देण्यासाठी ती झाली म्हणून एकमेकाससोबत भांडत बसण्यापेक्षा बसण्यापेक्षा साखरेला दर मिळवण्यासाठी सर्वपक्षीय लढा उभा करूया, असे आवाहन कुंभी कासारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी केले.
कुंभी- कासारी साखर कारखान्याच्या प्रशासकीय कार्यालयासमोर झालेल्या ६१व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षपदावरून अध्यक्ष नरके बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष निवास वातकर उपस्थित होते. अहवाल वाचन सचिव प्रशांत पाटील यांनी केले.
साखरेला दर नसल्याने एकरकमी एफआरपी देताना कर्जे काढावी लागत आहेत. केंद्र शासनाने एकरकमी एफआरपीचा कायदा करताना साखरेला उत्पादन खर्चाएवढा दर द्यायला हवा पण कोणत्याही सरकारने याबाबत ठोस निर्णय न घेतल्याने शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी देताना गेल्या दहा वर्षांत वारंवार कर्जे काढावी लागली.
अध्यक्ष नरके यांच्या प्रास्ताविकाच्या भाषणानंतर विषयवाचनातील पोटनियम दुरुस्तीवर आक्षेप घेऊन बाजीराव खाडे यांनी शेतकरी कोरोना व महापुराने अडचणीत असताना शेअर्स रक्कम ऊस बिलातून कपात केल्याने काही शेतकऱ्यांचे पीक कर्ज भागले नाही. त्यामुळे व्याजमाफीला हे शेतकरी मुकल्याचा आरोप केला. ५ हजार शेअर्स वाढीव रक्कमेला स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली. बाजीराव पाटील (कुडित्रे) यांनीही वाढीची रक्कम ऐच्छिक असल्याचे सांगितले. पण अध्यक्ष नरके म्हणाले १८ मे २०२१ ला शासनाने भाग रक्कम वाढ करण्याचे आदेश दिले आहेत. त्याला मागील सभेत मंजुरी घेऊनच ऊसबिलातून कपात केली आहे. जवळपास १३ हजार सभासदांचा गाळपासाठी ऊसच येत नसल्याने ती वसूल करण्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल उपस्थित केला. कारखान्याच्या हितासाठी ही वसूल सुरू आहे. अन्यथा भरणाऱ्यावर अन्याय होईल, असे सांगितले.
यावेळी बाळासाहेब खाडे व प्रकाश देसाई यांनी कारखान्यावर असलेल्या कर्जावर जोरदार आक्षेप घेतला. कारखान्यावर असलेल्या कर्जाची विगतवारी द्या व सध्या कारखान्यावर शिल्लक कर्ज किती ते जाहीर करण्याचा आग्रह धरला. पाच लाख ताळेबंदात नफा असेल तर कामगार पगार, तोडणी वाहतूक व इतर देणी थकली कशी? कारखान्यावर मालतारण सोडून १५१ कोटी कर्ज असल्याचा आरोप केला. कर्ज असताना को-जन व डिस्टिलरी प्रकल्प आणि आता इथेनॉल प्रकल्पाने कारखाना कर्जाच्या खाईत गेला असल्याचा आरोप झाला. पुढील वर्षाची एफआरपी देण्याची आपली कुवत आहे का असा प्रश्न करण्यात आला.
यावेळी अध्यक्ष नरके म्हणाले, वेळेत एफआरपी दिली नाही तर तुम्ही आंदोलने घेऊन येत होता. एफआरपीसाठी कर्जे झाली आहेत. आज कुंभी कारखान्याने जे उपपदार्थ निर्माण केलेले प्रकल्प आहेत असे सांगितले.