कोल्हापूर प्रतिनिधी : दुग्ध व्यवसायात एक दोन जनावरांवर खर्चाचा मेळ बसवत नफ्याचे गणित बसवणे अवघड बनत चालले आहे. अशावेळी विकसनशील देशांनी तरुणांच्या सहभागातून सहकारी तत्वावर सामुहिक पशुपालनाला चालना देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ. चेतन नरके यांनी केले. जागतिक दूध परिषदेच्या पूर्व संध्येला आयोजित “जगातील डेअरी उद्योगातील शेतकऱ्यांच्या समस्या” या विषयावर आयोजीत चर्चासत्रात ते बोलत होते.
वाढत्या लोकसंख्येच्या अन्नाची गरज भागवत असताना आहारात दुधाला फार महत्व आहे. या व्यवसायाचे भविष्य उज्वल आहे. त्यामुळे दुधाच्या उत्पादनात वाढ झाली पाहिजे. भारतामध्ये खर्चाच्या तुलनेत दुधाचे उत्पन्न कमी आहे. प्रती लिटर दुधाचा उत्पादन खर्च जास्त आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराचा अभाव आहे. गुजरात राज्य अथवा कोल्हापूर जिल्ह्या सारखी काही उदाहरणे सोडली तर हे क्षेत्र संघटीत करण्याची गरज आहे. जनावराचे वाण निवडण्यापासून त्याचे आरोग्य, लसीकरण, खाद्य -वैरण- पाणी व्यवस्थापन, कृत्रिम रेतन या सर्व बाबीमध्ये शास्त्रीय दृष्टीकोन निर्माण झाला पाहिजे.उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन कौशल्याचा खुबीने वापर करण्याची गरज आहे.
सहकारी तत्वावर पशु पालन सुरु झाले तर गुंतवणूक, मनुष्यबळ,आधुनिक तंत्रज्ञान, व्यवस्थापन या सर्व बाबी हाताळणे सोपे होईल, उत्पादन खर्च कमी करून, उत्पन्न वाढवता येईल. शासकीय योजनांचा लाभ घेता येईल. या करिता तरुण पिढीला पुढाकार घ्यावा लागेल. डॉ. वर्गीस कुरियन यांनी भारतात बिलिअन लिटर दूध उत्पादनाचे स्वप्न पहिले होते ते सत्यात उतरवण्यासाठी या क्षेत्रातील उद्योग संधी ओळखून तरुणांचा सहभाग वाढला पाहिजे असे ते म्हणाले.
या चर्चासत्रात भारत, चीन, जपान आणि इंडोनेशिया या देशातील तज्ञ सहभागी झाले होते. चर्चासत्राला अमूल चे कार्यकारी संचालक आर.एस. सोधी, यु के मधील सहकार आणि शेतीच्या अभ्यासक हेलन डोरोनॉम यांच्या सह विविध देशातील प्रतिनिधी उपस्थित होते.